पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनाआवास योजनेचा जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना
आवास योजनेचा जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा
         -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

            राज्यात धनगर समाजातील किमान दहा हजार लाभार्थ्यांना घरे देण्याचा शासनाचा निर्णय आहे. या आवास योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात या योजनेत अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. 

            भटक्या 'क' जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून यापुढे ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना म्हणून संबोधण्यात येणार आहे. योजनांमधून इतर मागासवर्गीय समाजातील सर्व महामानवांचे कार्य लोकांपर्यंत जावे. नव्या पिढीला जुन्या महान व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कार्याचा इतिहास कळावा. यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आवास योजना हे नामकरण करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

       इतर आवास योजनांच्या कामालाही गती देण्याचे निर्देश

       जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहू नये. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आवास योजनेचा लाभ मिळवून द्यावा. या योजनेतून अधिकाधिक नागरिकांना घरे मिळवून देण्यासह प्रधानमंत्री आवास योजना व विविध आवास योजनांच्या कामांनाही गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. 

       जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनुसारप्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसाह्य योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत यासह विविध योजनाही राबविण्यात येतात.

         प्रधानमंत्री आवास योजना सन २०१९-२० करिता २४ हजार १२५ लक्षांक प्राप्त असून या पैकी १६ हजार ९५६ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणाली द्वारे मंजुरी देण्यात आली आहे. पहिला हप्ता  १५ हजार १५२ तर दुसरा हफ्ता ११ हजार ३२०,  तिसरा हफ्ता ८ हजार ६१० लाभार्थ्यांना देण्यात आला  असुन   ५ हजार २८६  एवढी घरकुले पूर्ण आहेत. रमाई आवास योजनेत  सन २०१९-२० करीता ३ हजार लक्षांक प्राप्त असून यापैकी २ हजार ३२२  लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे देण्यात आली आहे.

            शबरी आवास योजनेत सन २०१९-२० करिता २ हजार लक्षांक प्राप्त असून पैकी १ हजार ५०६ लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. पहिला हप्ता ६७९ तर दुसरा हफ्ता ४७९ व तिसरा हफ्ता ३१० लाभार्थ्यांना देण्यात आला असुन १०८ एवढी घरकुले पूर्ण आहेत. पंडित दीनदयाळ जागा खरेदी अर्थसहाय  योजना  अंतर्गत अद्यापपर्यंत २४८ लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्याकरिता निधीचे अर्थसहाय  करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत ७५ लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत लाभ देण्यात आला आहे.

                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती