Tuesday, July 28, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते बेनोडा ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन




पालकमंत्र्यांच्या हस्ते बेनोडा ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन

पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी शासन कटिबद्ध

             -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बेनोडा येथे केले.

            वरूड तालुक्यातील बेनोडा येथील नियोजित ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. कोरोना संकटकाळामुळे काही कामांत अडथळे आले तरी त्यावर मात करून या कामांना चालना देण्यात येत आहे. कोरोना संकटकाळातही प्रत्येक अडचण दूर करून विकासाची गती वाढविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वदूर प्रयत्न होत आहेत.

या काळात रोजगाराची निर्मिती करण्याची गरज लक्षात घेऊन प्राधान्याने मनरेगातून पायाभूत सुविधांची कामे राबविण्यात आली. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी अमरावती जिल्ह्यात जलसंधारण, रस्ते आदी अनेक कामांना चालना देण्यात आली. त्यातून मोठी रोजगारनिर्मिती झाली. या कामांत अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर राहिला, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतभवनासाठी 15 लक्ष निधी मंजूर आहे. ग्रामपंचायत भवनामुळे गावातील सुविधेत भर पडणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक इमारतींची कामेही पूर्णत्वास जाण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासनानेही या कामांना गती द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.     

                             

विलगीकरण कक्षालाही भेट

बेनोडा शहिद येथील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रूग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले.

                                                00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...