वलगाव- दर्यापूर रस्त्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

         वलगाव- दर्यापूर रस्त्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे. या रस्त्यावरील खोलापूर येथील जंक्शन पॉईंटचे रूंदीकरण करण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
         पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज वलगाव- दर्यापूर रस्त्याच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, हरिभाऊ मोहोड, मुकद्दर पठाण आदी यावेळी उपस्थित होते.
        लॉकडाऊनमध्ये विकासकामांची गती काहीशी मंदावली होती. मात्र, विकासकामे नियोजनानुसार पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा निर्धार आहे. जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत 265 किलोमीटर लांबीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांचे कामेही रखडता कामा नयेत. पावसाळा लक्षात घेता प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आवश्यक कामे तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
        वलगाव- दर्यापूर रस्ता हायब्रीड ॲन्युइटीअंतर्गत मंजूर आहे. त्याची लांबी सुमारे 44 किलोमीटर असून, काम पूर्ण करण्याची मुदत मे 2021 पर्यंत आहे. अद्यापपर्यंत रस्त्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता श्री. जवंजाळ यांनी दिली.
        या रस्त्यावरील खोलापूर जंक्शनजवळील स्थानक व परिसरात होणारी वर्दळ पाहता येथे रस्त्याचे विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरण तत्काळ करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
       या रस्त्याच्या कामाप्रमाणेच अंजनगाव- दर्यापूर- म्हैसांग, वलगाव- दर्यापूर, अमरावती- कौंडण्यपूर,परतवाडा- चिखलदरा, रिद्धपूर- तिवसा, चांदूर रेल्वे- तळेगाव, तसेच अमरावती- अचलपूर हा चौपदरी रस्ता आदी विविध कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
      सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे पाचशे कोटी रूपयांचा निधीतून महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती