पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक




वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 13 : जंगल, वनसंपदा व वन्यजीवांचे संरक्षण ही प्राधान्याची बाब आहे. मात्र, असे करत असताना मेळघाटातील स्थानिक आदिवासी, गवळी बांधवांच्या अडचणींचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या क्षेत्रात शेती करण्यासाठी जाण्यासाठी, तसेच जनावरांना चराई क्षेत्राची मर्यादा घालून देऊन चराईची मुभा मिळणे आवश्यक आहे. वने व वन्यजीवांच्या संवर्धनासह वन्यजीव व मानवी संघर्ष या विषयाचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

याबाबत वनविभाग व आदिवासी बांधवांच्या प्रतिनिधी यांच्याशी लोकप्रतिनिधी, वन प्रशासन आदींनी एकत्र येऊन सर्व बाजू समजावून घेऊन कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या जनावरांना चराई क्षेत्र व इतर प्रश्नांसंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक श्रीनिवास, जिल्हा वनाधिकारी पियुषा जगताप, विकास माळी, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्यासह मेळघाटातील गावांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जंगल, वनसंपदा व व्याघ्र, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन या बाबींसह मेळघाटात शेकडो वर्षांपासून पिढ्यानुपिढ्या राहत आलेल्या आदिवासी बांधवांचे प्रश्नही समजावून घेतले पाहिजेत. व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारासोबत मेळघाटातील काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. काही नागरिक अजूनही त्याच गावात राहत आहेत. आदिवासी बांधवांची पाळीव जनावरे जंगलात चरण्यासाठी जातात, त्यांना वनविभाग ताब्यात घेऊन कारवाई करतात. या अशा घटनासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी वनविभागाने जंगलात वसलेल्या गावांना जनावरांसाठी चराई क्षेत्र निश्चित करुन देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

 

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, नियमांची अंमलबाजवणी करत असताना स्थानिकांच्या प्रश्नांवर तोडगेही काढता आले पाहिजेत. शेवटी कायम व नियम हे माणसांच्या हितासाठीच आहेत. त्या ठिकाणी पशुपालनाचा व्यवसाय करणारे अनेक बांधव राहतात. त्यामुळे पाळीव जनावरांच्या मालकांना चराई क्षेत्र तसेच शेती क्षेत्र आदी संदर्भात मर्यादा घालून द्याव्यात. पुनर्वसन झालेल्या गावात सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. जंगलातील गावात 100 हेक्टर क्षेत्र दुधाळ जनावरांच्या चराईसाठी उपलब्ध करुन देण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार वनहक्क समितीच्या सल्ल्याने चराई क्षेत्र निश्चित करुन जनावरांसाठी चराई क्षेत्र निर्माण करावे. वन्यजीव- मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी सर्व घटनामध्ये मानवीय दृष्टीकोन ठेवून वनविभागाने समन्वयातून कुठल्याही प्रश्नावर तोडगा काढावा, असे त्यांनी सांगितले. 

 

 

            मेळघाटातील प्रत्येक गावात वनहक्क समिती व गावकऱ्यांच्या सल्ल्याने पाळीव जनावरांसाठी चराई क्षेत्र ठरवून द्यावे. त्याठिकाणी वनविभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून  चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. येत्या दहा दिवसांत वनविभाग व महसूल विभाग तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअगोदर संबंधित विभागाने प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच आवश्यक उपाययोजनांविषयी मुद्दयांचा प्रस्ताव तयार करावा, यावर सकारात्मक निर्णय होईल यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावे. मेळघाटातील गावांत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

            राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, रायपूर व मांगिया गावातील वन विभागाने पकडलेल्या दुधाळ जनावरांना सुपूर्दनाम्यावर संबंधितांना सुपुर्द करावे. पुनर्वसन झालेल्या गावांत सुविधांची पूर्तता पूर्ण झाल्याशिवाय प्रकल्पनिर्मिती किंवा प्रकल्पांचे विस्तारीकरण करू नये, असे केंद्राचे धोरण आहे. मात्र, मेळघाटात असे घडलेले दिसून येत नाही. जंगल व वने राखताना स्थानिक आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाची साधने हिरावण्याचा प्रयत्न होऊ नये. पशुपालकांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. वन्यप्राण्यांकडून शेतीचे, पाळीव प्राण्याचे नुकसान होते. त्याचा मोबदला वन विभागाकडून वेळेत मिळाला पाहिजे.मेळघाटातील वनविभागाच्या क्षेत्रात बंधारा बांधकामाचे आदिवासी बांधवांचे मजुरीचे पैसे दीड वर्षांपासून थकित आहेत. ते त्यांना तत्काळ अदा करावेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.

                        पावसाळा लक्षात घेऊन मेळघाटमधील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, असे आमदार श्री. पटेल यांनी सांगितले.वन विभागाच्या अधिकारी- कर्मचा-यांनी प्रत्येक गावात जाऊन गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व गावनिहाय प्रश्न, त्यावरील उपाययोजना याबाबत एक संयुक्त प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती