तिवसा शहराच्या मुलभूत विकास कामांसाठी 4 कोटीचा निधी - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे विशेष प्रयत्न

तिवसा शहराच्या मुलभूत विकास कामांसाठी 4 कोटीचा निधी

-         पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे विशेष प्रयत्न

 

          अमरावती, दि. 24 : नवनिर्मित तिवसा नगर पंचायत क्षेत्रातील सतरा प्रभागात मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी तसेच विकासात्मक कामे पूर्ण करण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत चार कोटी रुपयाचा निधी नगरविकास खात्याने मंजूर केला आहे. नुकताच यासंदर्भात 23 जुलै रोजी शासन‍ निर्णय निर्गमित झाला असून यातून तिवसा शहराचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

 

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मागील काळात राज्य शासनाने नव्याने निर्माण झालेल्या तिवसा नगर पालिकेला कुठलाही निधी मंजूर केला नव्हता. परंतू, महाविकास आघाडीचे सरकार येताच जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळाली आहे. यापुढेही जिल्ह्यात सर्वदूर विविध सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने तिवसा शहरातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव तसेच तिवसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या दालनात महत्वाची बैठक घेऊन निधी मंजूरीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. तिवसा शहरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजूरीसाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

 

कोरोना विषाणूच्या संकट काळात संचारबंदीमुळे सदर निधी मंजूर होण्यास थोडा विलंब झाला होता. पंरतू, पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने निधी मंजूर झाल्यानिमित्त नगराध्यक्ष वैभव वानखडे, उपाध्यक्ष संध्या मुंदाने, विरोधी पक्ष नेते प्रदीप गौरखेडे व सर्व नगरसेवक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.

 

या विकास निधीतून अनेक वर्षांपासून रखडलेले रस्ते नाल्या, अण्णाभाऊ साठे स्मारक, गजानन महाराज मंदिर सभागृह, साई मंदिर सभागृह, ऋषी महाराज मंदिर सभागृह, शेख फरीद बाबा व रतनगीर महाराज परिसर सौंदर्यकरण, नागरींका मूलभूत सार्वजनिक सुविधा असे एकूण 90 कामे मंजूर झाली अूसन याबाबत तिवसा शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

पायाभूत सुविधांसह विविध कामांना चालना व सर्वांगीण विकासाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अमरावती जिल्ह्यात विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

 

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती