Thursday, July 9, 2020

आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव द्यावेत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक



आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव द्यावेत

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 9 : कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध उपायांची अंमलबजावणी होत असताना आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यामुळे विविध रूग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्र आदी विविध ठिकाणी सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांच्या अनुषंगाने बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची गती वाढविणेही आवश्यक आहे. त्यामुळे व्यापक सर्वेक्षण व तपासण्या हाती घ्याव्यात. जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्याच्या अनुषंगाने समग्र आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणांबाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

त्या म्हणाल्या की, आरोग्य यंत्रणेत उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामग्री, आवश्यक बाबी यांचा सविस्तर आढावा घेऊन तपशीलवार प्रस्ताव सादर करण्यात यावेत. आवश्यक बाबींसाठी  शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्य सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंध उपाययोजनांत अधिक काटेकोरपणा आणणे आवश्यक आहे. कोरोना संकटकाळात आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल आदी यंत्रणा आघाडीवर राहून लढत आहेत. मात्र, या कठीण काळात खंबीर राहून दृढपणे उपाय राबवले पाहिजेत व त्यात आवश्यक बाबींनुसार वेळोवेळी सुधारणाही केली पाहिजे. नागरिकांमध्ये जनजागृतीवरही भर देण्यात यावा.

कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे दक्षता उपायांचे पालन झालेच पाहिजे. त्यामुळे कुठेही शिस्तभंग झाल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई व्हावी. कंटेनमेंट झोनवर अधिक लक्ष केंद्रित करून तपासण्यांची संख्या वाढवावी. याठिकाणी नियमांचे पालन होण्यासाठी कडेकोट बंदोबस्तही असला पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिली.

 

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गत चार महिन्यांपासून विविध पातळ्यांवरून प्रयत्न होत आहेत. स्वतंत्र कोविड रूग्णालय, स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा उभारण्यासह जिल्हाव्यापी सर्वेक्षणही नियमितपणे घेण्यात येत आहेत. या प्रयत्नांत सातत्य ठेवावे. तपासण्या, वेळेत अहवाल प्राप्त होणे, संबंधित रुग्णाला तत्काळ दाखल करून घेणे आदी बाबी सुरळीत असाव्यात. कुठेही कुचराई होता कामा नये, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

नागरिकांनीही या काळात स्वच्छता, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आदी दक्षता उपायांचा अवलंब करावा. आपल्यासह इतरांनाही सुरक्षित करावे. सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करूया व कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...