लक्षणे नसलेल्या इच्छूक कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरणात उपचार - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

लक्षणे नसलेल्या इच्छूक कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरणात उपचार

-    जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 30 :  इच्छूक कोरोनाबाधित रूग्णांच्या घरी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात येणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना श्री. नवाल म्हणाले की, केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही इच्छूक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगी देण्यात येईल. त्यासाठी किमान चार खोल्यांचे घर व त्यात दोन बाथरूम अटॅच्ड खोल्या असणे आवश्यक आहे जेणेकरून रूग्णाला  बाथरूमसह स्वतंत्र खोली राहण्यासाठी व उपचारासाठी वापरता येईल व इतर कुटुंबियांचीही सुरक्षितता जपली जाईल.

            ते पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया जिल्ह्यात आकार घेईपर्यंत ती टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. सुरुवातीला दोन दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि नंतर गृह विलगीकरणाची परवानगी , असे त्याचे स्वरूप असेल. गृह विलगीकरणाच्या काळात रुग्णाच्या देखभालीसाठी केअरटेकरची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनशी चर्चा करण्यात येत आहे.  रुग्णाला सतरा दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागेल. रूग्णास आरोग्यसेतू ॲपचा वापर करावा लागेल. त्याशिवाय, संपर्कासाठी आणखी एक ॲप विकसित करण्यात येत आहे.  वृद्ध, ज्येष्ठ किंवा इतर गंभीर आजारांच्या रूग्णांना परवानगी देण्यात येणार नाही.

यापूर्वी संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेऊन बरे झालेल्या रूग्णांशी सतत संपर्क ठेवून विचारपूस करण्यासाठी हेल्थलाईन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचाही उपयोग गृह विलगीकरणातील व्यक्तींशी संपर्कासाठी होणार आहे.      

 

                                 

संचारबंदीच्या कालावधीत पी-1, पी- 2 तत्वावर दुकाने सुरू ठेवण्यासाठी यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता पी-1, पी-2 तत्वाची अट रद्द करण्यात आली आहे. शनिवार व रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याबाबत यापूर्वीच आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ते कायम राहतील. ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

         नागरिकांनी हातांची नियमित स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्क वापर या दक्षता नियमांचा अवलंब करून स्वत:सह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला गैरप्रकार लांच्छनास्पद असून, गुन्हेगारास कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा प्रकार घडता कामा नये, यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती