पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी



नुकसानग्रस्त भागातील रस्ते – पूल तत्काळ दुरुस्त करावेत


-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पूलाची तत्काळ दुरूस्ती करून संपर्कयंत्रणा भक्कम करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.अतिवृष्टीने जिल्ह्यातील काही गावांतील रस्ते, पुलाचे नुकसान झाले. त्याची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली. सालोरा खुर्द, नांदुरा किरकटे, आमला आदी गावांना भेट देऊन त्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्ते व पुलांची पाहणी केली. संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा पूर आल्याने अनेकदा रस्ते, पूल वाहून जातात. त्यामुळे अशी स्थिती लक्षात घेऊन दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी सुसज्ज यंत्रणा ठेवावी. कुठल्याही गावांचा संपर्क तुटता कामा नये. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या प्रत्येक भागाचे काटेकोर सर्वेक्षण करून रस्ते व पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यात भक्कम संपर्क यंत्रणा सुसज्ज असावी. मेळघाटात अनेकदा गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे तिथेही प्राधान्याने लक्ष देऊन रस्त्यांची व पुलाची कामे पूर्ण करावीत. पावसाळा लक्षात घेऊन भक्कम पायाभूत सुविधांसह आरोग्य यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पुरेसा औषध साठा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अतिवृष्टी झालेल्या विविध गावांना जोडणा-या रस्त्यांची व पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

                                                00000  





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती