Tuesday, July 21, 2020

पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

एक लाख शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देणार

               -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

           अमरावती, दि. 21 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात एक लाख शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही तत्काळ पूर्ण करावे. पात्र असलेल्या शेवटच्या शेतक-यापर्यंत योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

           जिल्ह्यात 1 लाख 32 हजार शेतकरी बांधवांची यादी अपलोड करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 17 हजार 99 शेतक-यांची यादी बँकांना प्राप्त आहे.  अद्यापपावेतो 1 लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरणही तत्काळ करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.           

 

योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण, त्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देणे बाकी आहे. त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी. त्याचप्रमाणे, खरीपासाठी पतपुरवठ्यालाही गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. मात्र,  प्रत्येक पात्र शेतकरी बांधवाला कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणाची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी व प्रत्येक पात्र शेतक-याला लाभ मिळवून द्यावा. कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-19 च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज देण्याचे निर्देश बँकांना यापूर्वीच देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

 

 

 

 

 

 

गावपातळीवर याद्या प्रसिद्ध

 

कोरोना संकटामुळे योजनेच्या अंमलबजावणीत काही प्रमाणात अडथळे आले मात्र, त्यावर मात करण्याचा प्रयत्न होत आहे.  योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाकडून गावोगाव आवाहन करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पुर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल व त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.

 

कापूस खरेदीलाही गती

 

जिल्ह्यात कापूस खरेदीलाही गती देण्यात आली असून, राज्य कापूस पणन महासंघामार्फत सात केंद्रावर, तसेच सीसीआयमार्फत दोन केंद्रावर खरेदी सुरू आहे. अद्यापपर्यंत 45 हजार 631 शेतकरी बांधवांचा 12 लक्ष 41 हजार 699 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यात राज्य कापूस पणन महासंघातमार्फत 39 हजार 767 शेतक-यांचा 11 लाख 21 हजार 500 क्विंटल, तर सीसीआयमार्फत 5 हजार 864 शेतकरी बांधवांचा 1 लाख 20 हजार 198 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती उपनिबंधक श्री. जाधव यांनी दिली.

 

जिल्ह्यातील मोर्शी व वरूड तालुकयातील शेतक-यांनी केलेली कापसाची नोंदणी अधिक असल्याने वेळेत खरेदी पूर्ण होण्यासाठी या तालुक्यांसाठी आणखी दोन केंद्रे वाढविण्यात आली आहेत.  मोर्शी व वरूड तालुक्यात शेतक-यांनी केलेली कापसाची नोंदणी अधिक असल्यामुळे कापूस खरेदीची प्रतीक्षा यादी मोठी आहे. हे लक्षात घेऊन कापूस खरेदीची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी राज्य पणन महासंघातर्फे वरूड तालुक्यासाठी लगतच्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील ओंकार इंडस्ट्रीज येथे, तर मोर्शी तालुक्यासाठी नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील गोपीनाथ इंडस्ट्रीज येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही श्री. जाधव यांनी दिली.

00000

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...