जिल्ह्यातील तरुणांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण मिळावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  जागतिक युवा कौशल्य दिन

  

जिल्ह्यातील तरुणांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण मिळावे

                - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना प्रशिक्षण आणि त्यानंतर योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागातर्फे माहिती तंत्रज्ञान व डिजीटल माध्यमांचा वापर करून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमांची जिल्ह्यात भरीव अंमलबजावणी व्हावी. प्रशिक्षण हे रोजगारक्षम असावे. त्यासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन प्रशिक्षणाची रचना असावी व अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन युवकांना मिळवून द्यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

 

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त राज्य शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातही कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभागातर्फे  विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता त्यातून भरीव रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.कोरोनाच्या काळात अनेक जण रोजगारापासून वंचित झाले. त्यामुळे पुन्हा स्थिती पूर्ववत करण्यासाठी व कोरोनाच्या आव्हानावर मात करुन सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन व्यापक प्रयत्न करित आहे. त्याच उद्देशाने नोकरीसाठी इच्छूक  असलेले उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयंम आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 2 हजार 759 उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यात सहभाग नोंदविला असून, मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार या उपक्रमात अधिकाधिक उद्योगांचा समावेश करून जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळवून द्यावा व ऑनलाईन मेळाव्यांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

विभागातर्फे 10 हजारांहून अधिक युवक प्रशिक्षित

 

कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभागामार्फत कौशल्य विकासासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान, किमान कौशल्य विकास योजना आदी योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात विविध कौशल्य विकास योजनांतून 10 हजार 633 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमार्फतही किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गारमेंट मेकिंग, बँकिंग अँड अकाऊंटिंग, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल, मेडिकल अँड नर्सिंग, जेम्स अँड ज्वेलरी आदींबाबत 20 हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे, धारणी व चिखलदरा तालुक्यातील उमेदवारांकरिता निवासी प्रशिक्षणही घेण्यात आले. प्रशिक्षणाला खेड्यापाड्यातून येणा-या विद्यार्थ्यांना  बस पासही मिळवून देण्यात आली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके यांनी दिली.

 

प्रशिक्षित युवक देताहेत कोरोना नियंत्रणासाठी योगदान

 

विभागाकडून मेडिकल व नर्सिंग कोर्समध्ये प्रशिक्षण मिळवलेले 15 उमेदवार कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजनांत योगदान देत आहेत. हे प्रशिक्षित युवक अमरावती महापालिकेत सेवा देत आहेत, अशी माहिती श्री. शेळके यांनी दिली. सध्याची लॉकडाऊनची स्थिती बघता जिल्ह्यात ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. कौशल्य विकास विभागाकडून विविध उद्योगांशी समन्वय साधून रिक्त पदांची माहिती मिळवली जात आहे. त्याशिवाय, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच रोजगार इच्छूक तरुण यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागामार्फत ऑनलाईन समुपदेशन करण्यात येत आहे, असेही श्री. शेळके यांनी सांगितले.

 

                                    00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती