Tuesday, July 7, 2020

सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महिला व बालविकास मंत्र्यांकडून ‘त्या’ महिलेला दिलासा
    योग्य उपचारानंतर कोरोना होतो पूर्णपणे बरा
      सामाजिक बहिष्कार घालणे हा गुन्हा
                          -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर         
             दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदगावपेठकडे धाव घेऊन त्या महिलेची भेट घेतली व तिला दिलासा दिला.
            कोरोना हा योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे असा आजार झालेल्या व्यक्तीविषयी बहिष्काराची भावना जोपासणे अत्यंत चुकीचे आहे. आपण स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे समजून कुणीही वागू नये. ही महामारी असल्याने या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कुणी बाधित होत असेल तर सहवेदना बाळगली पाहिजे. हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे, हे एक शास्त्रीय सत्य आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आपल्याच एका भगिनीला वाळीत टाकण्याची भावना ठेवणे हाच मुळात एक मानसिक आजार आहे. त्यामुळे कुणीही बहिष्काराची मानसिकता बाळगू नये व कारवाई करायला भाग पाडू नये, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
             याबाबत ठोस उपायांसाठी आपण शासन स्तरावर ही हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण यापूर्वी कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन रुग्णांची भेट घेतली आहे. आपण त्यादिवशी या भगीनीशी संवादही साधला होता. त्या खंबीर आहेत.
           कोरोनामुक्त झालेल्या या महिलेची व तिच्या कुटुंबाची तब्येत ठणठणीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे आता त्यांच्यात नाहीत. अशावेळी नागरिकांनी त्या भगिनीला हीन वागणूक देणे हा गुन्हा आहे. दवाखाने, रूग्णालये यांनीही रुग्णांना सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे. यानंतर इतरत्र कुठेही असा प्रकार घडता कामा नये. असा प्रकार कुठेही घडल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिली.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी या महिलेच्या घरी भेट देऊन तिची व तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली व या भगिनिला मायेने जवळ घेऊन दिलासा दिला.

                     गैरसमज दूर व्हावेत

            कोरोना आजार समूळ संपविण्यासाठी शासन-प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली पाहिजे. योग्य काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहू शकतो. कुणातही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. हा उपचारांनी पूर्णपणे बरा होणार आजार आहे. कुठलेही गैरसमज बाळगू नयेत. सर्वांनी मिळून एकजुटीने कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

            000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...