स्वच्छता, मास्क वापर व सोशल डिस्टन्सचा काटेकोर अवलंब करावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


पालकमंत्र्यांकडून विविध गावांत कोरोना उपाययोजनांची पाहणी

उपचारानंतर घरी परतलेल्या नागरिकांशी संवाद




स्वच्छता, मास्क वापर व सोशल डिस्टन्सचा काटेकोर अवलंब करावा

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 27 : कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेल्या विविध गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज घेतला. यावेळी उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढवले.

 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. अद्यापही अनेकदा नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. मात्र, असे दुर्लक्ष आपल्या स्वतःसह इतरांनाही धोक्यात टाकणारे असते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता नियम पाळावेत, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

 

अमरावती तालुक्यातील वलगाव, पुसदा, यावली शहिद, माऊली जहाँगीर, नांदुरा लष्करपुरा, नांदगावपेठ आदी गावांना भेट देऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तेथे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्र्यांनी उपचारानंतर बरे झालेल्या कोरोनाबाधितांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढविले. कोरोना उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता लक्षणे आढळणा-यांनी तपासणी व उपचार केले पाहिजेत. दक्षता नियमांनुसार सवयी अंगीकारल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

वलगाव क्वारंटाईन सेंटरला भेट

 

        वलगाव येथील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सेंटरमध्ये दाखल रूग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

                        सीएचओ’च्या रिक्त पदांबाबत कार्यवाही व्हावी

 

प्रत्येक गावात नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण व बाहेरून येणा-या व्यक्तींचे विलगीकरण यासह तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी डोअर टु डोअर सर्वेक्षण नियमित करावे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या रिक्त  पदांबाबत गावनिहाय आढावा घेऊन ती पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत आशा सेविका, अंगणवाडी सेविका अहोरात्र सेवा बजावत आहेत. त्या कोरोना लढवय्या आहेत, असे सांगून विविध गावांतील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावली शहीद ते नरसिंगपूर - शिराळा रस्त्यावरील पूल नादुरुस्त असल्याने त्यावरील वाहतूक थांबली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी तत्काळ आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुसदा- आष्टी रस्तेदुरूस्तीचे कामही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

         कोरोना संकटकाळात पुसदा येथे धान्य बँक उभारून गरजूंना वस्तूंचा पुरवठा करण्याचा उपक्रम गावकरी तरूणांनी राबवला. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी अभिजित सदणे व इतर मान्यवरांचे अभिनंदन केले. पुसदा येथील ॲड. अनिरूद्ध पाटील यांनी स्वागत केले. प्रशासक विस्तार अधिकारी (पंचायत) पांडुरंग उलेमाले यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.  

 

                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती