रोजगार निर्मितीसाठी उद्योग विभागाकडून महाजॉब्स पोर्टल

रोजगारनिर्मितीसाठी उद्योग विभागाकडून महाजॉब्स पोर्टल

‘महाजॉब्स’च्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळवून द्यावा

                          - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

             अमरावती, दि. 6 : राज्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी "महाजॉब्स" हे संकेतस्थळ उद्योग विभागातर्फे सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

स्थानिकांमध्ये रोजगाराची संधी निर्माण करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे  http://mahajobs.maharashtra.gov.in  हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याच अनुषंगाने महाजॉब्स हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रोजगार मिळविण्यासाठी इच्छूक युवकांना, तसेच उद्योगांसाठीही हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने यापूर्वीच ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कौशल्य विकास विभागातर्फे महास्वयंच्या माध्यमातून 200 पदांसाठी ऑनलाईन मेळावाही घेण्यात आला. आता उद्योग विभागाने सुरू केलेले पोर्टल नवीन उद्योगांत सुसूत्रता येण्यासाठी उपयुक्त ठरेल. महास्वयं व महापोर्टलमध्ये होणाऱ्या नोंदणीची माहिती ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी फायद्याची ठरेल. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांची नोंदणी होऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योग व कौशल्य विकास दोन्ही विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

ही प्रक्रिया राबवताना स्थानिक उद्योगांचाही समावेश होईल यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून इच्छूकांना स्थानिक स्तरावरही रोजगार मिळू शकेल. हे पोर्टल केवळ बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही, तर बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे पोर्टल आहे. या माध्यमातून उद्योगांची मनुष्यबळाची गरज भागणार असून, स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला. ही माहिती विविध माध्यमांतून सर्वदूर पोहोचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

     जिल्हा उद्योग केंद्रातर्फे यापूर्वी उद्योगांत उपलब्ध रोजगाराबाबत कौशल्य विकास विभागाच्या समन्वयाने महास्वयंच्या माध्यमातून प्रक्रिया होत होती. आता महास्वयंच्या जोडीला उद्योग विभागाचे महाजॉब्ज पोर्टलही सुरू झाल्याने रोजगारनिर्मितीच्या प्रक्रियेला गती येणार आहे. काल लोकार्पण झाल्यापासूनच या पोर्टलला उद्योजक व युवकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक उद्योग, तसेच युवकांची नोंदणी व त्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसाठी सर्वंकष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी यांनी दिली.

 

सतरा क्षेत्रांतील उद्योगांची निवड

 

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी 17 क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील विविध 950 व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे.   http://mahajobs.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती