Wednesday, July 29, 2020

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकऱ्यांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना

लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्तीसाठी पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकऱ्यांना लाभ

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि.29: ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.अमरावती जिल्ह्यात या योजनेत 3 लाख 14 हजार 598 खातेदारांची नोंदणी झाली आहे. पहिल्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेल्या खातेदारांची संख्या 2 लाख 91 हजार 258 आहे. योजनेत आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 69 हजार 706 खातेदारांना लाभ देण्यात आला आहे.

 

जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत मोहिम हाती घेण्यात आली आहे. काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्रुटी असलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सविस्तर आढावा घेऊन मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत. या कालावधीत महसूल यंत्रणेसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी परस्पर समन्वय ठेवून सर्व शेतकरी बांधवांच्या अर्जातील त्रुटी दूर कराव्यात व त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  

 

कोरोना संकटकाळात कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रे अडचणीत आहेत. हे लक्षात घेऊन शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाविकास आघाडी शासनाकडून विविध योजना- उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. किसान सन्मान योजनेसह कर्जमुक्ती योजना व इतर योजनांनाही गती देण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

       खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत आहे. त्यानुसार योजनेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा सहभाग मिळविण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक, तसेच आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी सेंटर) यांच्यामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी शेतकरी बांधवांनी अर्ज भरून घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे. योजनेतील सहभागासाठी तत्काळ  जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी,  उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी, तसेच नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी सेंटर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. चवाळे यांनी केले आहे.

 

00000

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...