Sunday, July 5, 2020

कोविड रुग्णालयाच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

कोविड रुग्णालयाच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि.5 : जिल्हा कोविड रुग्णालयाच्या जिल्हास्तरीय समिती स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, विविध सुविधांद्वारे सेवेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होत आहे. कोविड रुग्णालयात आता सीसीटीव्ही कॅमेरे, मदत कक्ष आदी सुविधा उभारण्यात येत असून, त्यादृष्टीने प्रशासनाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मदत कक्षाद्वारे रुग्णांच्या आप्त व नातेवाईकांना त्यांची विचारपूस करण्याची सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय पध्दती अंमलात आहे. कोरोनाच्या लक्षणांनुसार रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. अमरावतीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जिल्हा कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याद्वारे रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी  जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याद्वारे आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णयही जाहीर केला आहे. त्यानुसार या समितीने  कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी द्याव्यात व उपचार व सुविधांबाबत वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. 

 

     कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला आहे. ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. रुग्णालयांच्या भेटी दरम्यान समितीला सीसीटिव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. तशी व्यवस्था व्हावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना बोलता येईल यासाठी रुग्णालयात सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाला रुग्णालयाच्या आवारात प्रवेश द्यावा व नातलगाला थांबता येईल अशी जागा रुग्णालयात तयार करावी. कोरोना रुग्णालयांनी मदत कक्ष तयार करावा जेथे रुग्णांचे नातेवाईक प्रत्यक्ष येऊन किंवा दूरध्वनीद्वारे उपचार घेत असलेल्या आप्ताची विचारपूस करू शकतील.मात्र, याची अंमलबजावणी करताना पुरेशी दक्षता घेतली जावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

कोरोनाच्या रुग्णांची काळजी व्यवस्थित घेतली जावी त्यांना मिळणारे उपचार, कोरोनासाठी असलेल्या रुग्णालयांमधील सुविधा यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.  जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यातील महापालिका आयुक्त हे समिती सदस्य असून जिल्ह्यात असलेल्या शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी  किंवा हृदयविकार तज्ज्ञ किंवा त्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले जागतिक आरोग्य संघटनेचे क्षयरोग सल्लागार, जिल्ह्यातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यातील सामान्य औषधी विभागाचे प्रमुख, इंडियन मेडीकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

 

कोरोना रुग्णालयांना भेटी देऊन तेथील सुविधेची पाहणी करणे, भेटी दरम्यान समिती सदस्य विलगीकरण कक्ष, आयसीयु यांना भेटी देऊन रुग्णाला देण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती घेऊन कागदपत्रांची पाहणी करणे, अचानक भेटी देणे व नियमितपणे शासनाला अहवाल देणे, ही समितीची जबाबदारी आहे. त्यानुसार नियमित अंमलबजावणी करत रुग्णालयातील सेवेचा दर्जा उंचावण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...