ग्रामपंचायतींचे मतदान येत्या रविवारी

 

ग्रामपंचायतींचे मतदान येत्या रविवारी

अमरावती, दि.13 : ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपत असलेल्या व जून ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत उंबरखेड, घोटा, तसेच कवाडगव्हाण, चांदुर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत चांदूरवाडी, धारणी तालुक्यातील ग्रामपंचायत हरिसाल या तीन तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीमध्ये मतदान रविवार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.

मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामिण क्षेत्रातील मतदान केंद्रावर 17 सप्टेंबर रोजी मतदान पथके रवाना करण्यात येणार आहेत. निवडणूकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर व आसपासच्या परिसरामध्ये मतदारांची व नागरिकांची गर्दी होऊन मतदान केंद्रावर व्यत्यय निर्माण होऊ शकतो. यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने सूचित केलेल्या नियमावलींचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. याअंतर्गत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, फेरीवाले, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाच्या चिन्हाचे प्रदर्शन, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश प्रतिबंधित करण्यात येणार आहे.

 जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरामध्ये शनिवार दि. 17 सप्टेंबर रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर ते सोमवार दि. 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत काही बाबींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर तेथील परिसरातील सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध राहील. तसेच या कालावधीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाचे मंडप लावू नये. या परिसरात पक्षाचा प्रचार करणे, बेकायदेशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे, मतदारांना आमिष दाखविणे, मतदारांना मतदानापासून रोखणे, ज्वलनशील पदार्थ नेणे तसेच धुम्रपान करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

मतदान कालावधीमध्ये अनधिकृतरित्या मतदारांची वाहतूक, ने-आण करणे, मतदान केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणणे, राजकीय नेत्यांचे फोटो, चिन्ह लावणे, घोषणा करणे, मोठ्याने आवाज करणे, मतदारांव्यतिरिक्त जमाव करणे, झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बुथ यांच्यासह हॉटेल, पान दुकान तसेच खाद्य पदार्थांची दुकाने चालू ठेवता येणार नसल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जाहीर केले आहेत.

मतमोजणीच्या ठिकाणी कडक निर्बंध जाहीर

          ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी केंद्र जाहीर करण्यात आले आहेत. तिवसा तहसील कार्यालय व चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात संबंधित तालुक्यांची मतमोजणी होईल. तसेच धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात धारणी तालुक्याची मतमोजणी होईल. या ठिकाणाच्या शंभर मीटर परिसराच्या आत उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही येता येणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देवू नये. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल. या आदेशाबाबत जनजागृती होण्यासाठी ध्वनीक्षेपकाव्दारे प्रसिध्दी करण्यात यावी. तसेच हा आदेश मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावण्यात यावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती