गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 



गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार

-    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

अमरावती, दि.5 (विमाका):- व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे. नवनवीन प्रयोग, प्रात्यक्षिके, अभिनव कल्पनांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवित असतो. हे शिक्षण अधिक आनंददायी, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून शाळांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

शिक्षकदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षिका जयश्री गुल्हाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतांना म्हणाल्या, रोजगारासाठी पालकांचे स्थलांतर होत असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहत नाही. त्यांच्या अभ्यासात खंड पडतो. पालकांच्या स्थलांतर काळात विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी शाळेपासून दुरावतात. या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मेळघाटसारख्या आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षक भरती करतांना स्थानिक बोलीभाषेतील प्रशिक्षित - अप्रशिक्षित तरुणांना संधी देण्यात यावी असे त्यांनी सुचविले. अतुल ठाकरे यांनी गणित व विज्ञान विषयासाठी शिक्षक भरती करण्याबाबत सुचविले. गणित व विज्ञान विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता राहु नये. कुतूहुल निर्माण करत,  शिकवितांना रोचक पद्धतीचा  अवलंब करून  विद्यार्थ्यांमध्ये या विषयांची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचनालये, अद्ययावत प्रयोगशाळा, दर्जेदार शैक्षणिक साहित्याची उपलब्धता असावी असे श्री ठाकरे यांनी सांगितले.

शिक्षकांनी आजच्या संवादात उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याबाबत आपण प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणासाठी अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न असून, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याचे  नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरणात  समावेश  करण्यात येईल. शिक्षण घेण्यास पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांवरचा विश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नवे प्रयोग विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागले आहे, असे त्यांनी यावेळी सागितले.

निदा उर्दू हायस्कूलचे सुफी मजहर अली, मनीबाई गुजराती हायस्कूलच्या अंजली देव, न्यू हायस्कूलचे सहायक शिक्षक संजय रामावत, संत कंवरराम हायस्कूलच्या मंजू अडवाणी, मंगरुळ चवाळा, घटांग, सैदापूर, भिलखेडा, जैतादेवी येथील जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक वैजनाथ इप्पर, प्रकाश लिंगोट, गणेश जामुनकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती