महिला बालविकास व आरोग्य विभागाच्या कार्यशाळेला भूमकांचा भरभरून प्रतिसाद


 

महिला बालविकास व आरोग्य विभागाच्या कार्यशाळेला भूमकांचा भरभरून प्रतिसाद

          अमरावती, दि. 23 : राष्ट्रीय पोषण महिन्याचे औचित्य साधून परतवाड्यात जीवन विकास संस्था, महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटातील 75 गावांमधील 100 भूमका-पडिहार यांची एकदिवसीय कार्यशाळा आज झाली.

          मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी भूमकांना सहभागी करुन घेत त्यांना आरोग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. त्यानुसार कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

          भूमका-पडिहार यांचा मेळघाटातील जनमानसात मोठ्या प्रमाणात पगडा आहे, त्यांचे मत परिवर्तन करून त्यांना आरोग्य शिक्षणाकडे वळवणे, प्रशिक्षित करणे या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

          भूमकांनी आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागाच्या सुविधा घेण्यासाठी लोकांचे मत परिवर्तन केले तर मोठ्या प्रमाणात बदल दिसून येईल. त्यामुळे त्यांनी शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनीही मार्गदर्शन केले.  

          यावेळी प्रशिक्षणाबरोबरच आरोग्याच्या सुविधा, अंगणवाडी आहार आदींबाबत भूमकांनी नागरीकांचे समुपदेशन करण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. सहभागी सर्व भूमकांनी यापुढे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि आरोग्य विभागांचे औषधी आणि गोळ्या गरजू रुग्णांना देण्याविषयी हमी दिली.

          यावेळी दुपारच्या सत्रात भुसुमलाल नामक भूमका व्यक्तीने उत्सफूर्तपणे उभे राहून सर्वांना मार्गदर्शन केले. त्याला सर्व भूमकांनी मोठी दाद दिली.

          बालकांचे आरोग्य, वजन उंची, कुपोषण, गरोदर मातेची काळजी, आवश्यक वेळी दवाखान्यात दाखल होणे यासाठी भूमकांनी करावयाच्या कार्यवाहीचे सविस्तर विवेचन भुसुमलाल यांनी कोरकू बोलीतून केले.

           कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जीवन विकास संस्थेचे फादर जोश, सिस्टर हिरा, साधना, मुकुंद देशमुख यांनी परिश्रम घेतले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती