Tuesday, September 20, 2022

अंमली पदार्थांच्या वापरावरील प्रतिबंधासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक · समितीच्या बैठकीत चर्चा



 




अंमली पदार्थांच्या वापरावरील  प्रतिबंधासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक

·       समितीच्या बैठकीत चर्चा

अमरावती, दि. 20 : अंमली पदार्थ वापराच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी केले.

 अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी श्री. ठोसरे यांनी सदस्यांशी संवाद साधून चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत महल्ले, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधीक्षक जी. बी. देशमुख,  अन्न व औषध प्रशासन  सहायक आयुक्त यु. बी. घरोटे, अमरावती डाकघर जनसंपर्क निरीक्षक नरेंद्र गिरपुंजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बरेचदा टपाल विभागामध्ये येणारे पार्सल संबंधित व्यक्तीच्या  चुकीच्या पत्त्यामुळे प्राप्त  होत नाही. यानंतर संबंधित व्यक्ती टपाल विभागात जावुन आपले पार्सल प्राप्त करून घेतात. यामुळे खऱ्या पत्त्याबाबत व त्या संबंधित व्यक्तीबाबत माहिती जाहीर होत नाही. या बाबीचा अंमली पदार्थांच्या व्यवहारात वापर झाल्याचे यापूर्वी आढळले आहे. यासाठी टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुनच व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे, अशी सूचना यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईचा आढावा घेणे, अंमली पदाथांचे मानवी मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,  टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही यासाठी लक्ष ठेवणे, जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय राखणे, दाखल झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याबाबतची माहिती, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, एनडीपीएसअंतर्गत गुन्ह्यांचे तपासी अधिकारी यांना प्रशिक्षण देणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आलेत.

अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात अन्न व औषध विभागाने वेळोवेळी तपासणी करण्यासंबंधी यावेळी संबंधितांना सूचित करण्यात आले.  विविध विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवावा, आदी विविध निर्देश बैठकीत देण्यात आले. श्री. ठोसरे यांनी समितीची कार्यपद्धती व कार्यवाहीची प्रारंभी माहिती दिली.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...