अपघातात पाय मोडलेल्या गरोदर महिलेला उपचारांबरोबरच आर्थिक मदत आरोग्य पथकाची कामगिरी

 







अपघातात पाय मोडलेल्या गरोदर महिलेला उपचारांबरोबरच आर्थिक मदत

आरोग्य पथकाची कामगिरी  

            अमरावती, दि. 20 : झाडाची फांदी कोसळल्याने पायाचे हाड मोडलेल्या एका गरोदर महिलेला नागपूर येथे तत्काळ उपचार मिळवून देत व त्यानंतर सुखरुप संस्थात्मक प्रसुतीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा साद्राबाडी आरोग्य पथकाने केला. या महिलेच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचा हात ही आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिला.

 धारणी तालुक्यातील भवर हे गाव धारणीपासून 48 कि.मी.अंतरावर आहे. तेथील राधा किसन भिलावेकर या 30 वर्षीय महिला गरोदर असताना आईकडे माहेरी सुसर्दा या गावी गेलेल्या होत्या. त्या दि. 28 मे रोजी आईच्या शेतात गेल्या असताना एका मोहाच्या झाडाखाली विसावा घेत होत्या. त्यांच्या पायावर मोहाची फांदी जोरात आदळून पायाची हाडे मोडून नुकसान झाले. घटनेबाबत माहिती मिळताच साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात पोहोचते केले. तथापि, मोठ्या शस्त्रक्रियेची गरज पाहता तिथे तात्पुरते ड्रेसिंग करून अमरावतीच्या जिल्हा रूग्णालयात त्वरित संदर्भित करण्यात आले. तेथेही मोठी शस्त्रक्रिया होत नसल्याने त्याच रात्री 12 वाजता  त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.

उपचाराची तातडीची गरज लक्षात घेऊन पथकाने या प्रक्रियेत पूर्ण वेळ सोबत राहून नागपूरला रुग्णाला भरती केले. अपघात अचानक झाल्याने रुग्णाची कोणतीही कागदपत्रे सोबत नव्हती. शस्त्रक्रिया मोठी असल्याने सवलतीच्या योजनेसाठी कागदपत्रे आवश्यक होती. त्यात महिला गरोदरही होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम मालवीय यांनी  कागदपत्र आणून देण्याची जबाबदारी घेतली.  तिथे दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. तथापि, दुर्देवाने महिलेचा पाय कापावा लागला.

महिलेची आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने नागपूरला राहण्यासाठी येणारा खर्च त्यांना झेपावणारा नव्हता. या बाबीचा विचार करून आरोग्य पथकानेच पुढाकार घेत आर्थिक मदत उभी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. तिलोत्तमा वानखडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम मालवीय, साद्राबाडी समुपदेशक ममता सोनकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पैसे गोळा करून 30 हजार रुपयांची आर्थिक मदत  केली. सुमारे साडेतीन महिन्यांच्या उपचारानंतर या महिलेला नागपूरहून धारणी येथे आणण्यात आले. तिच्या नियमित ड्रेसिंगसाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

दोन महिने उपजिल्हा रुग्णालयात राहिल्यानंतर दि. 15 सप्टेंबरला तिची सुखरुप प्रसूती झाली. आरोग्य सेविका  शीतल निंभोरकर, कालिया कासदेकर, ममता सोनकर, सुरेंद्र पटोरकर, फुलवंती कासदेकर, अविनाश ठाकरे यांनी सहकार्य केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती