महापदयात्रेसाठी परतवाडा ते चिखलदरा वाहतूक घटांगमार्गे वळवली

 






महापदयात्रेसाठी परतवाडा ते चिखलदरा

वाहतूक घटांगमार्गे वळवली

 

अमरावती, दि.27 : नवरात्रौत्सवानिमित्त परतवाड्यापासून चिखलदरा येथे श्री अंबादेवी दर्शनासाठी कावड यात्रा (महापदयात्रा) दि. २९ सप्टेंबरला पहाटे काढण्यात येणार आहे. या यात्रेत सुमारे २५ हजार भाविक सहभागी होतील. त्यामुळे दि. २९ सप्टेंबरला ००.०१ वा. ते २२ वाजता दरम्यान परतवाडा ते चिखलदरा वाहतूक घटांग मार्गे वळविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.

  याबाबत चिखलदरा तहसील कार्यालयातही सभा होऊन यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. नवरंग चिखलदरा देवीदर्शन महापदयात्रा महोत्सव समितीचे सचिव अरुण घोटकर, तहसीलदार माया माने, अंबादेवी संस्थानचे प्रतिनिधी, चिखलदरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.  

   शहरात येणाऱ्या दुचाकीकरिता पार्किंगची व्यवस्था हर्षवर्धन हॉटेलजवळील परिसरात करण्यात आली असून चारचाकी वाहनाची पार्कीगची व्यवस्था ही शिवमंदिर, शहापूर परिसर येथे करण्यात आली आहे. महापदयात्रेकरिता येणा-या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त स्वच्छतागृहांची व्यवस्था नियोजन समिती महापदयात्रा व नगर पालिका प्रशासन यांच्या मार्फत करण्याचे सुचना देण्यात आलेल्या आहेत.

 महापदयात्रेदरम्यान परतवाडा ते आडनदी हद्दीपर्यंत  नायब तहसीलदार सचिन साळुंके व तलाठी पी. एस. भाष्कर, आडनदीपासून ते श्रीक्षेत्र अंबादेवी येथे कावड यात्रेचे समापन होईपर्यंत नायब तहसिलदार गजानन राजगडे व मंडळ अधिकारी प्रवीण कावलकर यांची कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 महापदयात्रेदरम्यान  पोलीस, तसेच गाविलगड व घटांगचे वन परिक्षेत्र अधिका-यांमार्फत आवश्यक बंदोबस्त ठेवण्याचे, तसेच वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रूग्णालयाला देण्यात आले आहेत. भाविकांनी परिसराची स्वच्छता, निसर्गाचे संवर्धन व  कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती माने यांनी केले.

 

0000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती