पदवीधर मतदार संघ निवडणूक अधिकाधिक पदवीधरांनी नोंदणी करावी - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 








पदवीधर मतदार संघ निवडणूक

अधिकाधिक पदवीधरांनी नोंदणी करावी

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

 

पुनरिक्षण कार्यक्रमाचा कालावधी

 

पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषद सदस्यांची मुदत दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे.  निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरु होत आहे.             दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विभागातील पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

 

मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्दी शनिवार                           दि. 1 ऑक्टोबरला होईल. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुन:प्रसिध्दी शनिवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी, तर वर्तमानपत्रातील नोटीसची व्दितीय पुन:प्रसिध्दी मंगळवार, दि. 25 ऑक्टोबरला करण्यात येईल.

 

नमुना 18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम सोमवार दि. 7 नोव्हेंबर राहील. जुना नमुना स्वीकारला जाणार नाही.  हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार, दि. 19 नोव्हेंबर तर प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल.

 

दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा बुधवार, दि. 23 नोव्हेंबर  ते शुक्रवार दि. 9 डिसेंबर पर्यंत राहील. दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे याची अंतिम मुदत रविवार, दि. 25 डिसेंबर आहे. तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्द शुक्रवार, दि. 30 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

पदवीधर मतदार संघाच्या प्रत्येक निवडणूकीत मतदाराला नव्याने नोंदणी करावी लागते. ज्या व्यक्तीस पदवीधर होऊन तीन वर्षे झाली अथवा 1 नोव्हेंबर 2019 पूर्वीचा पदवीधर आहे ती व्यक्ती या निवडणूकीस मतदान करण्यासाठी पात्र आहे. मागील सन 2017 च्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये अमरावती जिल्ह्यामधून 76 हजार 686 मतदारांनी मतदान केले होते.

 

मतदारांनी जास्तीतजास्त संख्येने मतदान करण्यासाठी शासनातर्फे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदान करण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. गत निवडणूकीत मतदान केलेल्या मतदारांना देखील नव्याने नोंदणी करावी लागणार आहे.

 

मतदार यादीत नाव कुठे नोंदवावे ?

 

मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी नमुना 18 भरावा लागेल. हा नमुना संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच हा परिपूर्ण अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. नमुना 18 मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या http://cep.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Download form/Form-18.pdf येथेही उपलब्ध आहे.

 

परिपूर्ण भरलेला नमुना 18, त्यासोबत शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक पुराव्यासह संबधित कार्यालयात सादर करावा. अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात सादर करतांना अर्जासोबत मूळ पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रिका किंवा अन्य विहित कागदपत्रे दाखवावे लागतील.  टपालाव्दारे नमुना 18 पाठविल्यास, संबंधित शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा/कागदपत्रे प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

 

एकत्रित स्वरुपात (गठ्ठा) अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाव्दारे स्विकारण्यात येत नाहीत. तथापि, संस्था प्रमुख त्यांच्या संस्थेतील पात्र पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितरित्या सादर करु शकतात. राजकीय पक्ष, मतदान केंद्र निहाय प्रतिनिधी किंवा रहिवासी कल्याणकारी संघटना यांच्यामार्फत एकत्रित स्वरुपात अर्ज प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अमरावती जिल्ह्यात 90 हजार फॉर्म वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी दिली.

 

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती