Monday, July 11, 2016

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुर परिस्थितीची
 जिल्हाधिकारी गित्ते यांच्याकडून पाहणी 
* वलगाव, नया अकोला, जावरा, खानापूर गावांना भेटी
* मदत वाटपासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश
* जलयुक्तमधुन नाला खोलिकरणाचे काम घेणार 
       अमरावती, दि.11 : अमरावती जिल्ह्यात मागील 3-4 दिवसात अतिवृष्टी झाली. साधारण 55 मि.मी. पाऊस तर काही ठिकाणी 100, 125 मि.मी. पाऊस झाल्यामुळे पेढी नदी व तिच्या उपनद्या, नाले भरुन वाहत आहेत. त्यामुळे सुमारे 20-22 गावांना या पुराचा त्रास होतो. अमरावती तालुक्यातील वलगाव, नया अकोला, खानापुर व भातकुली तालुक्यातील जावरा, कामनापुर या गावात घरांची पडझड झाली, शेतातील पीकांचे नुकसान झाले, पीके वाहुन गेली त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मदत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भेट देऊन ग्रामस्थांना तातडीने मदत वाटप करण्यासाठी यंत्रणेला नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.
          आमदार ॲड. यशोमती ठाकुर, उप विभागीय अधिकारी अमरावती प्रविण ठाकरे, उप विभागीय अधिकारी भातकुली शिवाजी जगताप, तहसिलदार सुरेश बगळे, वैशाली पाथरे आदी उपस्थित होते.
          यावेळी गावकरी म्हणाले की, पेढी नदी व उपनद्यांना येणाऱ्या पुरामुळे काठावरील गावांना सारखा त्रास होतो. जावरा व कामनापूर या दोन गावामधुन रेणुका नदी वाहते. ही नदी पुढे पेढी नदिला मिळते. या नदिवर पुल नसल्यामुळे वाहतुकिची साधने बंद होतात, शाळेत विद्यार्थ्यांना जाता येत नाही, गावात पाणी शिरते. खानापूर व थुगाव गावांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे रेणुका नदी पात्रात जलयुक्त शिवार अभियानातुन नाला खोलिकरणाची कामे घेण्यात येतील. नंतर या नदिवर पुल घेण्याची कार्यवाही करु असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
          ज्यांच्या ज्यांच्या घरांची पडझड होवुन तसेच शेती पीके वाहुन जावुन ज्यांचे नुकसान झाले आहे त्याचा सर्वेक्षण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नया अकोला गावात 26 घरांची पडझड झाली. नाला तुंबल्यामुळे घरात पाणी शिरले, लोकांना शासनाकडून तातडीने मदत करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
00000
काचावार/गावंडे/सागर-झिमटे/खंडारकर/दि.11-7-16/16-00 वाजता










No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...