Wednesday, July 27, 2016

जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घ्यावा
पोरगव्हाण जलयुक्त शिवार कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
* एकदरा ग्रामस्थांशी साधला संवाद

          अमरावती, दि. 27 : जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. वरुड तालुक्यातील पोरगव्हाण या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर एकदरा गावास भेट देवून तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वरुडचे तहसिलदार आशिष बिजवल, गटविकास अधिकारी बोपटे, जि.प.सभापती गिरीश कराड, एकदराचे सरपंच रामभाऊ गायधणे आदी उपस्थित होते.

          यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोरगव्हाण येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची पाहणी केली. या गावात लोकसहभागातून जलसंधारण, विहिर पुनर्भरण, पांदण रस्ते, आरोग्य सुविधा, स्वच्छतेची कामे, महिला सबलिकरण, बेरोजगारांना रोजगार आदी सर्व कामांचे नियोजन करण्यात आले असुन मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन ही कामे करण्यात येणार आहेत.
          जिल्हाधिकारी म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची वाढती मागणी व वाढता आवाका लक्षात घेता आणखी अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे प्रामुख्याने जलसंधारण, कृषि, लघु सिंचन, भुजल सर्वेक्षण या यंत्रणेमार्फत करण्यात येतात. अमरावती जिल्ह्यात जल संधारण विभागाचे सहा कार्यकारी अभियंता कार्यरत असुन त्यांनी  देखील या कामांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पाच लक्ष रुपयापर्यंतची कामे ग्राम पंचायती करु शकतात. यासाठी ग्राम पंचायतींही सुद्धा लहान स्वरुपाची कामे हाती घ्यावीत.
          वरुड तालुक्यातील मौजे पोरगव्हाण हे गाव सन 2016-17 च्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये समाविष्ट असुन या गावची लोकसंख्या 750 आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्येही या गावाने सहभाग घेतला असुन खुप चांगले काम करुन दाखविले आहे. गावाला लागुन असलेल्या टेकडीवर माथा ते पायथा या सुत्रानुसार माथ्यापासुन ते पायथ्यापर्यंत जलसंधारणाची कामे घेतली आहेत. पठारावर गावतळे घेण्यात आले असुन खाली सलग समतल चर (सिसिटी, डिसीट) ही कामे लोकसहभागातून घेतली आहेत. श्रमदानातुन जलसंधारण ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे या गावाने राबविली आहे. डोंगरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून एक हजार व श्रमदानातुन एक हजार असे दोन हजार वृक्षांची लागवड केली आहे.




          वॉटर कप स्पर्धेत माती नाला बांध, नाला खोलिकरण श्रमदानातुन झाले आहे. सन 2016-17 मध्ये हे गाव जलयुक्त शिवार अभियानामध्ये असुन नाला खोलिकरणाची 21 प्रस्तावित कामे पुर्ण करण्यात आली आहे. साडेचार किलोमिटर लांबीचा नाला खोलिकरण व रुंदिकरणाचे काम झाले आहे. यामुळे गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हातानी पाणी घेता येईल इतक्या वर जलस्तर आला आहे. या गावात महिला नर्सरीही सुरु करण्यात आली असुन त्यांच्यामार्फत विविध झाडांची जोपासना करण्यात येत आहे.
          पोहगव्हाणला जवळपास 500 हेक्टर जंगलाचे क्षेत्र लाभले आहे. त्यामध्येही वृक्ष लागवडीचा ग्रामस्थांचा मानस आहे.
एकदरा ग्रामस्थांशी संवाद
          वरुड तालुक्यातील एकदरा गावास भेट देवून जिल्हाधिकारी गित्ते यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तेथे घेण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. एकदरा हे गाव वरुड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. वर्धा नदीच्या काठावर डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. या गावात वर्धा नदीवर एक कोल्हापुरी बंधारा पुर्वी बांधण्यात आला होता तो जिर्ण झाला असुन त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
          आमनेर प्राथमिक केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवुन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली.     
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.27-07-2016/17-30 वाजता











No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...