दादासाहेब गवई देशाचे लोकनेते
पालकमंत्री प्रविण पोटे
·                                                                              दादासाहेब गवई यांच्या स्मारक संकूलाचे भूमीपुजन संपन्न
·                                                                                          स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही
·          
          अमरावती दि.25 – दिवंगत नेते रा.सू.उपाख्य दादासाहेब गवई यांनी आपल्या जीवनात शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम केले. समाजातील शेवटचा घटक सुखी, समाधानी झाला पाहीजे, हीच सदैव त्यांची मनोकामना राहीली. त्यादृष्टीने ते प्रयत्न करीत राहीले, त्यामुळे देशात ते लोकनेते म्हणून पुढे आले, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज काढले.
   दिवंगत नेते रा. सू  उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकूल भूमीपुजन कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीसरात करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. श्रीमती कमलताई  न्यायमूर्ती भूषण गवई, डॉ.राजेंद्र गवई,आमदार डॉ.सुनिल देशमुख, आ.डॉ.अनिल बोंडे, आ. रवि राणा, आ.यशोमतीताई ठाकुर,  महापौर चरणजित कौर नंदा,अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. थूल, जिल्हाधिकारी किरण गित्ते, कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, माजी आमदार गुलाबराव गावंडे, माजी आ. बि.टी.देशमुख, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, सुबोध वाघमोडे, मनपा आयुक्त हेमंत पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
          दादासाहेब गवई यांच्या स्मारकाला शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगत पालकमंत्री पोटे म्हणाले, नियोजित काल मर्यादेत स्मारकाची उभारणी पूर्ण करण्यात येईल. स्मारक केवळ दादासाहेब गवई यांच्या पुतळ्याची जागा राहाणार नसून ते सर्वांचे प्रेरणास्थळ राहिल.
          न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दादासाहेबांच्या पहिल्याच स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन गवई परिवारातर्फे सर्वांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली दादासाहेब गवई यांच्या स्मारकाची केलेली घोषणा 11 महिन्यात मूर्त रुपात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. अमरावती ही दादासाहेब गवईंची कर्मभूमी आहे असे सांगून न्या.गवई म्हणाले की, येथून दादासाहेबांच्या शालेय जिवनाची सुरुवात झाली आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील योगदानाची सर्वांनाच माहिती आहे. त्यांना संत गाडगे महाराजांचा सहवास लाभला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा त्यांचा जवळचा संबंध आला. संपूर्ण आयुष्यात त्यांनी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्याला वाहून घेतले असे सांगून या स्मारक संकूलात त्यांच्या कार्याची सदैव ओळख राहिल असे पूर्णाकृती पुतळा, फोटो गॅलरी, ऑडिटोरियम, 1200 क्षमतेचे भव्य सभागृह, दुसरे 3-4 सभागृह, रेस्ट हाऊस आदी राहाणार आहे.
          जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले की, दादासाहेब हे अमरावतीचे भुमिपूत्र होते. त्यांनी राजकीय, सामाजिक पटलावर 50 वर्षाहून अधिक काळ सेवा केली. रोजगार हमी योजना सुरु करावी म्हणून त्यांनी पायाभूत काम केले.  असे सांगून त्यांच्या विविध कार्याचा मागोवा घेतला. त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि त्यांनी केलेल्या विविध साहित्य संपदेची माहिती दिली. डॉ.राजेंद्र गवई यांनी उपस्थितांचे आभार मानले.
                                                00000
काचावार/सागर/दि.25-07-2016/14-15 वाजता















Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती