Friday, July 15, 2016

पंतप्रधान पीक विमा योजनेचे मिशन मोड वर काम करा
पालकमंत्री प्रविण पोटे

       अमरावती, दि.15 : पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना सर्वकष पद्धतीने पीक संरक्षण देणारी व विम्याचे कवच देणारी सर्वेात्तम पीक विमा योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि, महसुल, बँक या घटकांनी मिशन मोड प्रमाणे काम करावे अशी सुचना पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज दिली.
            विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयातर्फे आयोजित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2016-17 या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कृषि अधिक्षक दत्तात्रय मुळे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये योजनेची विस्तृत माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विभागीय कृषि कार्यालयातील प्रियंका भोसले यांनी पीक विमा योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी व उपाय यावर मार्गदर्शन केले. व्यासपिठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय कृषि अधिक्षक चव्हाळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामटेके उपस्थित होते.
            कमी वेळेत चांगल्या पद्धतीच्या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी कृषि विभागाचे कौतुक केले. पीक विम्याचा अर्ज हा सुलभ व सोप्या भाषेत असल्यामुळे तो भरतांना अडचणी येणार नाही. पीक विमा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे व हा हक्क त्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांची मुले म्हणून किंवा मित्र म्हणून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भुमिका बजावली पाहिजे असे आवाहन ही पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले.
            जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की, पीक विमा योजनेची ही सहावी योजना असुन महाराष्ट्रात दिड कोटी शेतकरी असुन त्यापैकी फक्त 28-30 टक्के शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये 80 टक्के प्रिमियम शासन भरणार असुन 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे म्हणून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना पोहचला पाहिजे. राष्ट्रीयस्तरावर पीक विम्याची टक्केवारी फक्त 22 टक्के आहे ती वाढवून 50 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी पीक विमा योजना राबवायची आहे. पीक विम्यासाठी खाजगी कंपन्या कार्यरत असुन जिल्ह्याचे काम रिलायन्स इन्शुरंस कंपनीला देण्यात आले आहे. जिल्ह्यात 360 बँक मॅनेजर असुन प्रत्येकाने काम केल्यास तीन लाखाच्यावर शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचविता येईल. गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे सहभाग वाढला आहे. महसुल व कृषि विभाग तसेच बँकांनी समन्वयाने ही योजना यशस्वी करावी असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी पंतप्रधान पीक विमा योजनेशी संबंधित हस्तपत्रक व पोस्टर्सचे विमोचन पालकमंत्री व जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
            कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, कृषि विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी, बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
00000
काचावार/वाघ/गावंडे/सागर/दि.15-7-2016/15-03 वाजता








No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...