पोषण चळवळ लोक चळवळ म्हणुन राबवा - सुप्रभा अग्रवाल
जिल्हा संवाद कार्यशाळा

       अमरावती, दि. 21 : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातुन 1975 सालापासुन कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नांना सकारात्मक विचार देऊन ती लोकचळवळ व्हावी, हा प्रयत्न झाला पाहिजे. मानव विकास हा लोक चळवळीतूनच होऊ शकतो. त्यामुळे राजमाता जिजाऊ मिशन ने राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी पोषण चळवळ सुरु केली आहे. याद्वारे सरकारी यंत्रणा, समुपदेशन आणि लोकसहभाग यांची सांगड घालुन मानव विकास कुपोषणावर मात करणारी पोषण चळवळ ही लोक चळवळ म्हणुन राबविण्याचे आवाहन राजमाता जिजाऊ मिशन च्या संचालक सुप्रभा अग्रवाल यांनी केले.

          जिल्हा परिषद महिला बाल विकास विभाग अमरावती, राजमाता जिजाऊ मिशन मुंबई, टाटा सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोषण चळवळी अंतर्गत जिल्हा संवाद कार्यशाळेत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झालेल्या कार्यशाळेत राजमाता जिजाऊ मिशन मुंबई च्या संचालक सुप्रभा अग्रवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, राजमाता जिजाऊ मिशनचे उपसंचालक अशोक पावडे, मिशनचे अशोक पुथ्रन, एमआयएस व्यवस्थापक उल्हास खळेगांवकर, मिशनचे सल्लागार प्रफुल्ल रंगारी, दिव्या सराफ, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तट्टे, वित्त अधिकारी खंडारे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राजमाता मिशनच्या संचालक सुप्रभा अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिका यांना समुपदेशाच्या पद्धतीत बदल करण्यासोबत पोषण चळवळीत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी गृह बल विकास केंद्राच्या माध्यमातुन पोषण चळवळ घरा-घरापर्यत कशी पोहचविता येईल, याकडे भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मेळघाटातील कुपोषण आणि अति कुपोषित बालकांच्या स्वास्थ्यावर एकत्रित रित्या काम करण्याचे, जननी सुरक्षे बरोबरच किशोरी सशक्तिकरणावर भर देण्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.



राजमाता जिजाऊ मिशनचे उपसंचालक अशोक पावडे यांनी पोषण चळवळीच्या माध्यमातुन राज्याला कुपोषण मुक्त कसे करता येईल, यावर भर देतांना म्हटले कि एका राज्याच्या हंगामा अहवालानुसार 85 टक्के लोकांना नियमित पोषण आहार कसा घ्यावा, याची माहिती नाही. पोषण आहार संतुलीत नसेल तर कुपोषणाला सुरुवात होते. मानव विकास साधायचा असेल तर प्रत्येकाला पोषणावर भर देण्याची आवश्यकता आहे. विशेष करुन मेळघाट सारख्या भागात पोषणावर भर देण्याची गरज आहे. जिल्हा परिषद प्रशासन आमचा गांव, आमचा विकास कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पोषण चळवळीला चालना देण्याचे आवाहन ही त्यांनी केले. बालक, गरोदर माता, किशोरींना शास्त्रशुद्ध पोषण आहार देता यावा यासाठी अंगणवाडी परिसरात परसबागेची संकल्पना राबवावी. गरोदर माता संगोपन या कार्यक्रमांतर्गत 9 जुलैला राज्यात मातृसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. 20 जुलै रोजी राज्यातील 1 लक्ष 10 हजार अंगणवाड्यांपैकी 78 हजार अंगणवाड्यांमध्ये डोहाळे जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात 29 जुलै रोजी अतिरिक्त पोषण कार्यक्रम, ऑगस्ट महिण्यात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शाश्वत विकासाचा मुळ भाग म्हणजे स्तनपान, सप्टेंबर महिण्यात आहार सप्ताह, ऑक्टोंबर मध्ये किशोरी संगोपन कार्यक्रमांतर्गत आजची मुलगी उद्याची माता, कमी वजनाची बालके जन्माला येऊ नये यासाठी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम योजना मेळघाटासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच अमरावती जिल्ह्यात राब‍विण्यात येणाऱ्या स्वानंदी योजनेच्या नाविण्यपुर्ण संकल्पनेचे त्यांनी भर-भरुन कौतुक केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी प्रास्ताविक भाषणातुन जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देत असतांना 18 अंगणवाडी केंद्राला मिळालेले आयएसओ प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या पुढाकाराने मेळघाटच्या 10 हजार मुलांचे सुक्ष्म नियोजन करण्याकरीता 1 कोटी 25 लक्ष रु. ची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती दिली. त्याच बरोबर व्हिलेज चाईड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातुन 1 ऑगस्ट पासुन सुरु जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व आंगणवाडी केंद्रावर राबिवल्या जाणाऱ्या अक्षय पात्र योजनेची विस्तृत माहिती यावेळी सादर केली.
 यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम समन्वयक क्षीप्रा मानकर तथा आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी भातकुली येथील किर्ती खन्ना यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी मंचासमोर ठेवण्यात आलेल्या अक्षय पात्र, आयएचआर पाककलेची माहिती घेतली. संवाद कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रानंतर उपस्थित पर्यवेक्षिकांनी प्रात्यक्षिक सादर केले. त्याच बरोबर मिशनच्या वतीने चलचित्राद्वारे पोषण चळवळ कशा पद्धतीने राबवायची आहे. यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
00000
काचावार/कोल्हे/राजपुत/रोकडे.दि.21-7-2016/18-15





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती