Tuesday, April 10, 2018

देशातील पहिला प्रयोग
आदिवासी विकास निधी योजनांचे मुल्यमापन क्वेस्टव्दारे
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 10 : आदिवासी विकासासाठी शासनातर्फे आखण्यात आलेल्या विकासनिधी व योजनांचे नियोजन, नियंत्रण व मूल्यमापन क्वेस्ट केंद्राव्दारे होणार असून खऱ्या अर्थाने आदिवासींपर्यंत  विकास पोहोचविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असे आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
आदिवासी विकास विभागाव्दारे तयार केलेल्या  क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation) Office या नाविन्यपूर्णनियोजन व मूल्यमापन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवराउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री आदिवासी विकास अंबरीशराव आत्राम, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, प्रधान सचिव मनीषा वर्मा उपस्थित होते.
क्वेस्ट केंद्र ही देशातील पहिले शासकीय योजनांचे संनियत्रण, मुल्यमापन करणारे केंद्र असुन यामुळे विकास योजनांची परिणामकारकता वाढविणे, उपलब्ध निधींचा योग्य वापर करणे, नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
क्वेस्ट अंतर्गत आदिवासी उपयोजना (टीएसपी)केंद्रीय अर्थसहाय्य आणि विशेष प्रकल्पांचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोठे योगदान राहणार आहे. हे केंद्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेंतर्गत मुंबईत स्थापन केले असून, त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत आता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे केले जाते. या डिबीटीमुळे विभागाच्या कामात पारदर्शकता आली आहे. नामांकित शाळांतील आदिवासी विद्यार्थी प्रवेश योजनेची चांगली अंमलबजावणी विभागामार्फत होत आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य यासह विभागाच्या योजनांची अमंलबजावणी व परिणामकारकता वाढण्यास क्वेस्ट केंद्र उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी  व्यक्त केली.
मिशन शौर्यमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
आदिवासी विकास विभागातर्फे मिशन शौर्य मोहिमेंतर्गंत आदिवासी आश्रमशाळेतील एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर निघालेल्या दहा विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. जगातील सर्वात उंच शिखरावर जाण्याचा हा ऐतिहासिक क्षण तुमच्या आयुष्यात आला आहे. हिमतीने जा, ताकदीने जा व भारताचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवुन या. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मिशन शौर्यमध्ये एव्हरेस्ट सर करण्यासाठीचा तिरंगा झेंडा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चमुला सुपुर्द करण्यात आला. आकाश मडावी व मनीषा धुर्वे या विद्यार्थ्यानी अनुभव सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्याना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना सोळाव्या वर्षी एव्हरेस्ट फत्ते या प्रेरणादायी पुस्तकांच्या प्रती देण्यात आल्या.
0000



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...