Tuesday, April 24, 2018

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा
जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे ध्येय ठेवा
-         जिल्हाधिकारी अभिजित बांगर
          अमरावती, दि. 24 : पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे ध्येय ठेवून कामे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे केले. तालुका प्रशासनाने या कामांसाठी भरीव प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
          पानी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाकडून धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील सहभागी गावांत कामे सुरु आहेत. स्पर्धेसाठी 334 गावांतील प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले आहे. या गावांतील नियोजन व अडचणींबाबत प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक नियोजनभवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
          जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, रोहयो उपजिल्हाधिकारी डी. आर. काळे, संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन जैन, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, बाबासाहेब राऊत, फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे आदी उपस्थित होते.         
          स्पर्धेत सहभागी गावांत गत पंधरवड्यात जलसंधारणाची कामे सुरु झाली. उर्वरित एका महिन्याच्या कालावधीत  कामे पूर्ण करण्यासाठी  अधिकाधिक लोकसहभाग मिळवत प्रशासनाने जोरदार प्रयत्न करावेत, असे सांगून श्री. बांगर म्हणाले की, सहभागी गावांकडून अपेक्षित काम व खर्चाबाबत अर्ज येताच उपविभागीय अधिका-यांनी त्याला तत्काळ मान्यता द्यावी. स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता कामे गतीने व्हावीत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील परिस्थिती लक्षात घेऊन तेथे काम करणा-या मजूरांना ‘मनरेगा’अंतर्गत वेतन दिले जाईल.  
          श्री. जैन म्हणाले की, धारणी तालुक्यासाठी खांडवा व ब-हाणपूर येथून यंत्रे मागविण्यात आली आहेत. प्रत्येक गावाला जेसीबी, पोकलँड आदी यंत्रसामग्री पुरविण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या गावात चांगले काम होत असेल तर केवळ गुणांच्या तांत्रिकतेत न अडकता तिथे यंत्र दिले जाईल.
गावात झालेल्या प्रत्येक कामाची नोंद ॲपमध्ये घ्यावी, असे आवाहन श्री. काळे यांनी केले.



वॉटरकप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून कालावधी दि. 8 एप्रिल ते 22 मे आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये आणि 40 लाख रुपये रोख पारितोषिक आणि प्रत्येक तालुक्यातील आघाडीवरील गावाला प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धा महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांतील 75 तालुक्यांत विस्तारली आहे.
45 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत गावक-यांनी श्रमदान तसेच यंत्रांच्या सहाय्याने जलसंधारणाच्या अनेक कामांतून पाणी साठवण क्षमता निर्माण करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...