Saturday, April 7, 2018

‘इर्विन’मध्ये जूनपासून केमोथेरपी युनिट
गरीब व गरजू रुग्णांसाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णय
                                     पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 7 :  कर्करोगावरील उपचारांसाठी केमोथेरपी युनिट जिल्हा रुग्णालयात जूनपासून सुरु होणार असून, आता जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज सांगितले.      
            जिल्हा रुग्णालयांत विनामूल्य केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्याचा समावेश व्हावा, यासाठी पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे इर्विनमध्ये हे युनिट लवकरच कार्यान्वित होईल. अमरावतीसह नागपूर, अकोला, गडचिरोली, पुणे,  जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आदी जिल्ह्यांत पहिला टप्पा राबविण्यात येईल. 
     श्री. पोटे- पाटील म्हणाले की, केमोथेरपीचा सहा आठवड्यांचा कोर्स घेण्यासाठी रुग्णांना मुंबईला जावे लागते. ही सुविधा अमरावतीत सुरु होत असल्याने आता रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. तसेच, प्रवासाचा खर्च व वेळेत बचत होईल आणि रुग्णाची दगदग कमी होईल.
युनिटसाठी  जिल्हा रुग्णालयातील फिजिशियन आणि नर्स यांना मुंबई येथे टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने  मेडिकल ऑन्कोलॉजी विभागात तीन आठवड्यांचे  प्रशिक्षण  लवकरच देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, तिथे लागणारी औषधे, साधनसामग्री याबाबतही कार्यवाही तत्काळ पूर्ण होईल. दुस-या टप्प्यात राज्यातील इतर जिल्ह्यातही ही सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...