औरंगाबाद जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना
पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील श्रीरामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. योजना कार्यान्वित करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निधीतून पाच कोटी 79 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
वैजापूर तालुक्यातील 16 गावांतील शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती. नाबार्ड व औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अर्थसहाय्यातून 1993 मध्ये ही योजना कार्यान्वित झाली होती. त्यानंतर 1994-95 व 1995-96 या दोन वर्षात अनुक्रमे 755 व 97 हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे ही योजना बंद आहे. याअगोदर नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अशा प्रकारे बंद असणाऱ्या उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
ही योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यास सुमारे 4 हजार 400 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन श्रीरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे टप्पा क्र. 1 व 2 (प्रत्येकी दोन पंप) कार्यान्वित करण्यासाठी यांत्रिकीविद्युत व स्थापत्य कामांच्या अंदाजपत्रकानुसार पाच कोटी 79 लाख इतका निधी जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती