विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे
                                                                                                                जिल्हाधिकारी अभिजित बांगर
          अमरावती,दि.24: विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीदरम्यान सर्व संबंधितांकडून आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.  
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2018 अंतर्गत अमरावती जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, तात्काळ प्रभावाने आचारसंहिताही लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी विविध अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस. पी. पाटील, पोलीस उपअधीक्षक शिरीष राठोड, पोलीस निरीक्षक निलीमा आरज, नायब तहसीलदार नीता लबडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. कोळी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व अन्य अधिकारी यांनी समन्वयाने प्रयत्न करावे. कुठेही गैरप्रकार घडू नयेत आणि कायदा व सुव्यवस्थेत बाधा येऊ नये, यासाठी चोख बंदोबस्त असावा. आचारसंहितेतील नियमांचा भंग होत असल्याचे तत्काळ कार्यवाही करावी. आवश्यक व्हिडीओ चित्रीकरण आदी तरतुदींचे काटेकोर पालन करावे. सर्व संबंधितांनीही आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती