जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा
           संभाव्य पाणी टंचाईबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात
                                    -जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे निर्देश
* 30 एप्रिलपूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती, दि.5: जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी ‍महसूल व ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करुन तात्काळ उपाययोजना कराव्यात. पाणी उपलब्धतेबाबत नागरिकांकडून मागणी येण्याची वाट न पाहता तालुक्यातील सर्व गावातील जल उपलब्धता तपासून तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज येथे दिले.
उन्हाळा लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाई, आगामी हंगामातील पीक नियोजन, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारणाच्या योजना आदी विविध विषयांवर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  मनीषा खत्री, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी विभाग, जलसंपदा, पशुसंवर्धन, जीवन प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की, संभाव्य पाणीटंचाई पाहता विहीर अधिग्रहण, विंधनविहीरी आदी कामे प्रलंबित राहता कामा नयेत. आवश्यकता तिथे पाणी उपलब्ध करुन  देण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी. संभाव्य टंचाईबाबत वस्तुस्थिती व केलेल्या उपाययोजनांची माहितीही नागरिकांसमोर आली पाहिजे. 
          जिल्ह्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 45 नवीन विंधनविहीरी व 19 कुपनलिका अशी 64 कामे पूर्ण व 47 प्रगतीपथावर आहेत. 178 नळयोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. 48 तात्पुरत्या पूरक कामांना प्रशासकीय मंजूरी मिळून 23 योजनांचे  कार्यारंभ आदेश दिले आहेत. 43 गावांमध्ये 49 खाजगी विहीरी अधिग्रहित करुन पिण्याच पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेवून 52 गावात 55 टँकर प्रस्तावित आहेत, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. यातील प्रलंबित कामांचा तत्काळ पाठपुरावा करुन ती 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
                                      जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी
          जलसंधारणाची कामे 30 एप्रिलपूर्वी  पूर्ण झाली  पाहिजेत. जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या कामांचे जिओ  टॅगिंग झाल्याशिवाय कामाचा मोबदला देऊ नये. शेततळ्यांच्या कामासाठी जेसीबी, पोकलँड आदी यंत्रणा प्राधान्याने देण्यात यावी. खारपाणपट्ट्यात ‘वॉटर कप’सह शेततळ्यांची कामे गतीने राबवावीत. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी धडकसिंचन विहिरींचा कामनिहाय आढावा घ्यावा. जी कामे सुरु झाली नसतील, ती रद्द करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
                                      खत, बियाणे, चारा उपलब्धता
          खरीपाच्या पूर्व तयारीसाठी बियाणे उपलब्ध असावे म्हणून ‘महाबीज’कडे तात्काळ मागणी नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. जिल्ह्यात कपाशीचे ‘बीजी-2’ हे बियाणे साडेनऊ लाख पाकीटे लागेल, असा अंदाज कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सांगितला. ‘बीजी-3’ या बियाण्याच्या अवैध पद्धतीने विक्रीवर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न व जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. खतांच्या उपलब्धतेबाबत तत्काळ कार्यवाहीचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले.
          जिल्ह्यातील पशुधन लक्षात घेता 1 लाख 2 हजार 723 मेट्रीक टन चाऱ्याची प्रतिमहिना मागणी असते त्यानुसार  जिल्ह्यातील उत्पादन व इतर मार्गाने उपलब्ध होणारा चारा पाहता जून 2018 पर्यंत चारा पुरेल अशी माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.
                                             पीक कर्ज वाटप
जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की, पीक कर्ज वाटपाबाबत त्वरित कार्यवाही सुरु करावी. सर्व तालुका अधिकाऱ्यांनी पात्र अर्जदारांची यादी व बँकांची तयारी तपासावी. सोसायट्यांच्या सचिवांच्या बैठका घ्याव्यात व पीक कर्ज वेळेत वितरीत होण्यासाठी प्रयत्न करावेत. पीक कर्जाबाबत येत्या हंगामात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख 23 हजार शेतकरी पात्र ठरत असल्याचे सहकार विभागामार्फत सांगण्यात आले.  याबाबत तालुकानिहाय अधिक काटेकोर आकडेवारी मिळविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.  
          जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीचा वेग कमी होता कामा नये, असेही ते म्हणाले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती