सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
जलसंधारणातून दुष्काळ संपविण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमदानातून वाढवला गावकऱ्यांचा उत्साह
            अमरावती, दि. 25 : ‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज श्रमदान करुन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.
            पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी माणिकपूरमध्ये गत पंधरवड्यात सलग समतल चर, माती बांध, दगडी अनगड बांध आदी जलसंधारणाची कामे  श्रमदानातून ग्रामस्थांनी हाती घेतली आहेत. काही कामे पूर्णही झाली आहेत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने पाझर तलावातील गाळ काढणे व इतर कामांसाठी यंत्र पुरविण्यात आले आहे.
            जिल्हाधिकारी श्री. बांगर हे आज पहाटेच आपल्या सहकाऱ्यांसह माणिकपूर येथे काम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचले. त्यांनी स्वत: कुदळ व फावडे घेऊन सर्वांसह चर खणण्याच्या व दगड माती उचलण्याच्या श्रमदानाला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश काळे, तहसीलदार आशिष बिजवल व विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही श्रमदान केले. ग्रामस्थांसह परिसरातील कार्यकर्ते व नागरिक, महिला, आबालवृद्ध सगळेच श्रमदानाच्या कार्यात सहभागी झाले होते. ‘जल है तो कल है’, ‘दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा ज्ञानेश्वरी शिरसाम या चिमुकल्या बालिकेसह सर्व आबालवृद्ध देत होते. सर्वांनीच समरसून श्रमदान केले. झटांगझिरी गावातही समतल सलग चर, अनगड दगडी बांध आदी कामांमध्ये जिल्हाधिकारी व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. दगड वाहून नेण्याच्या कामासाठी मानवी साखळीही उभारण्यात आली होती.
            जलसंधारणाच्या कामातून माणिकपूर गावातील जलस्त्रोतांचे पुनर्भरण होऊन 1 कोटी 20 लाख लीटरहून अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. पाझर तलावातील गाळ काढल्यामुळे तेथेही अधिक पाणी साठवण होण्यास मदत होईल. झटांगझिरी येथील कामातून डोंगरावरील माती धरणात वाहून जाणे थांबेल व भूजल पातळी वाढेल. गावकऱ्यांनी जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे उद्दिष्ट समोर ठेवून श्रमदान करावे व प्रशासनानेही अधिक लोकसहभाग मिळवून कामे पूर्ण करावी, असे श्री. बांगर यांनी सांगितले.
            सरपंच वंदना गुर्जर, भारतीय जैन संघटनेचे सुनील जैन, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे, तालुका समन्वयक उज्वल कराळे, हरीष खासबागे, श्रीमती चौधरी आदींनी श्रमदानात सहभाग घेतला.
00000







Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती