Friday, November 10, 2023

शासन आपल्या दारी-शासनाचा अभिनव उपक्रम 26 नोव्हेंबर रोजी

 





शासन आपल्या दारी-शासनाचा अभिनव उपक्रम 26 नोव्हेंबर रोजी

अमरावती, दि. 10 (जिमाका): शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ शासनामार्फत राबविण्यात येत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे रविवार, दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंन्स स्कोर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज महसूल भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री तसेच मा. मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात येणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी तसेच विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

प्र. जिल्हाधिकारी श्री. वाघमारे म्हणाले, या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. कार्यक्रमस्थळी प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपसात समन्वय साधून कार्यक्रमाच्या यशस्वीतेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी असे निर्देश दिले.

शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे कार्यालयेही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्यात वेळ खर्ची जातो. लाभार्थ्यांना शासकीय येाजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी शासनाने शासन आपल्या दारी उपक्रम सुरु केला आहे.

            कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांची ने-आण करणे, त्या अनुषंगाने वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, कार्यक्रमस्थळी स्वच्छता विषयक व्यवस्था, शौचालय सुविधा, वीज, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, खाद्यान्ने तसेच पाणी आणि आसन व्यवस्था, पार्कींग व्यवस्था याबाबत संबंधित विभागांशी आढावा बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

            कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले नियोजन करावे, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सविस्तर माहिती दिली. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...