Wednesday, November 1, 2023

कोषागार कार्यालयातील सभागृह निवृत्त वेतनधारकांसाठी उपयुक्त ठरेल - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 









कोषागार कार्यालयातील सभागृह निवृत्त वेतनधारकांसाठी उपयुक्त ठरेल

-     जिल्हाधिकारी सौरभ कटियार

जिल्हा कोषागार कार्यालय येथे भूमीपूजन सोहळा संपन्न

 

          अमरावती, दि. 1 (जिमाका) : प्रशासनामध्ये वित्त विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. वित्त विभागाला प्रशासनातील आर्थिक व्यवहार तर सांभाळावेच लागतात शिवाय निवृत्त वेतनधारकांचे प्रश्न सोडवावे लागतात. जिल्हा कोषागार कार्यालयात येणाऱ्या निवृत्त वेतनधारकांना आसन व्यवस्था तसेच प्रशासनातील विविध बैठकांसाठी कोषागार कार्यालयातील सभागृह निश्चितच मदतनीस ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज व्यक्त केला.

जिल्हा कोषागार कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत प्राप्त निधीतून जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रांगणात सभागृह बांधकामाचा भूमीपूजन सोहळा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक ग्रामीण अविनाश बारगळ, अमरावती विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक प्रिया तेलकुंटे, सहसंचालक स्थानिक निधी लेखा विभाग विनोद गायकवाड, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, मनपाचे लेखा व वित्त अधिकारी श्याम देव व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, प्रशासनाला मानवी चेहरा देण्यासाठी शासन कटिबध्द् आहे. निवृत्तीवेतनधारकाचे प्रश्न लवकर निकाली निघावे, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नियमितपणे पाठपुरवठा करण्यात येतो. तसेच जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी विविध कार्यशाळेचे नियमितपणे आयोजन करण्यात येते. या सभागृहामुळे कोषागार कार्यालयाच्या प्रांगणातच विविध कार्यशाळा व बैठकांचे आयोजन करणे सुलभ होईल. वित्त विभागाच्या आज्ञावलीमध्ये वेळोवेळी नव-नवीन बदल होत असतात. नवीन आज्ञावली तसेच नियमावलीमध्ये सातत्याने होणारे बदल येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आत्मसात करावे लागते. लोकाभिमुख प्रशासनासाठी कोषागार कार्यालयातच आगंतुकांसाठी सर्व सुविधेने सुसज्ज सभागृहाचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सभागृह बांधकामाबाबत माहिती दिली. अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये एकूण निवृत्तीवेतनधानकांची संख्या 32 हजार 877 आहे. यामध्ये निवृत्तीवेतनधारकांची संख्या 21 हजार 406, कुटुंब निवृत्तीवेतनधारक 11 हजार 276, इतर राज्यांचे निवृत्तीवेतनधारक 156, केंद्र शासनाचे निवृत्तीवेतनधान 6 तर राजकीय निवृत्तीवेतनधारकांची संख्या 33 एवढी आहे. जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तवेतनधानकांना दरमहा वेळेवर निवृत्तीवेतन अदा होईल याबाबत दक्षता घेण्यात येते. निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणीने निराकरण करण्यासाठी मेळावे घेण्यात येतात. तसेच महालेखापाल नागपूर यांच्यामार्फत आयोजित पेंशन अदालत अंतर्गत निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी जलद गतीने काढल्या जातात. या सर्व कामकाज व बैठकांसाठी सभागृह उपलब्ध ठरेल. या सभागृहाच्या बांधकामासाठी 95.65 लक्ष रुपये मंजूर झाले आहे. हे सभागृहामध्ये विविध सोई-सुविधांनी सुसज्ज राहणार असल्याचे श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस कवायतीमार्फत जिल्हाधिकारी श्री. कटियार तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोषागार कार्यालयाच्या प्रांगणातील भूमीपूजन फलकाचे अनावरण करण्यात आले.

अपर कोषागार अधिकारी सुनील वाकोडे, सहायक लेखाधिकारी प्रदीप भुयार, जयदेव देशपांडे, राहुल रत्नपारखी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालन लेखाधिकारी रवींद्र जोगी तर आभार उपलेखापाल श्रीकांत वाजपेयी यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...