येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 






येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 

             अमरावती, दि. 27 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमाअंतर्गत दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत प्रयेक मतदार संघात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदार व नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

            मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात माहिती देण्यासाठी महसुल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय, डॉ. पंजाबराव देशमुख प्रशिक्षण व विकास प्रबोधिनीचे संचालक तथा समन्वय अधिकारी अजय लहाने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, निवडणूक नायब तहसीलदार प्रविण देशमुख तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत मतदार नोंदणी, अद्यावतीकरण व शुद्धीकरण करण्यात येत आहे.   18 वर्षे पूर्ण झालेले नवमतदार तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यत पोहोचून मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. मोहिमेंतर्गत  रविवार दि. 26 नोव्हेंबर, शनिवार दि. 2 डिसेंबर व रविवार दि. 3 डिसेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

            प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक असून या मोहिम कालावधीत मतदारांनी नाव नोंदणी व दुरुस्त्या करुन घ्यावे. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करण्यात येते आहे. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही तसेच मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाईल. प्रत्येक बीएलओ यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे. मतदार नोंदणीकरीता विविध माध्यमाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटक्या जमाती, सेस्कवर्कर, थर्ड जेन्डर, दिव्यांग मतदारांसाठी तसेच नवमतदारांसाठी आतापर्यंत 148 शिबिरे आयोजित करण्यात येऊन त्यामध्ये 5 हजार 585 फॉर्म गोळा करुन मतदार नोंदणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिली.

 

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरूष मतदारसंख्या 12 लक्ष 38 हजार 044, स्त्री मतदार संख्या 11 लक्ष 62 हजार 536 व तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकुण 24 लक्ष 662 होती. तर दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरूष मतदार संख्या 12 लक्ष 33 हजार 378 आहे. स्त्री मतदारांची संख्या 11 लक्ष 59 हजार 157 तर तृतीयपंथी 82, सर्व्हिस व्होटर 3 हजार 289 असे एकूण मतदार संख्या 23 लक्ष 92 हजार 617 आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 664 मतदान केंद्रे आहेत.

 

           नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती