Thursday, November 16, 2023

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी माध्यमातून करा - प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे





 ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेची अंमलबजावणी

 प्रभावी माध्यमातून करा

- प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे

अमरावती, दि. 16 (जिमाका): दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. भारत शासनाच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय साधून विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी माध्यमातून करावी, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे श्री. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली भारत सरकार वित्त मंत्रालयाचे उपसचिव आदित्य भोजगढिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपजिल्हाधिकारी राम लंके, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे तसेच विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात श्री. वाघमारे मार्गदर्शन करताना म्हणाले की, या यात्रेमार्फत ग्राम स्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून सुसज्ज अशा व्हॅन्स जिल्ह्यात येणार असून त्यांच्यामार्फत महानगरपालिका ते ग्रामीण स्तरावर केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी केली जाणार आहे.

ही यात्रा पुढील टप्प्यात गावपातळी, सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे श्री. वाघमारे यांनी सांगितले. या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही यंत्रणांनी करावी. या यात्रेसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याची व्यवस्था, स्थळ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. शहरी भागासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तर ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी यावेळी दिल्या.

*****


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...