आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना स्पर्धा परीक्षापूर्व
प्रशिक्षणाची संधी
अमरावती, दि. 16 (जिमाका): आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा येथे शासनाव्दारे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेसाठी आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षणाव्दारे तयारी करुन घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी 1 डिसेंबर ते 15 मार्च 2024 पर्यंत आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा 1 हजार रुपये दराने विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो. या प्रशिक्षण कालावधीत अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज बुधवार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा येथे सादर करावे.
अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड http://rojgar.mahaswayam.in इत्यादी प्रती व एक स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. प्रशिक्षण निवडीसाठी उमेदवारांसाठी गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीच्यावेळी शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र या मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवड यादी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. संपर्कासाठी क्रमांक 07223-221205, 7709432024 उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
पात्रता
उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, उमेदवाराचे वय किमान 18 ते 30 च्या दरम्यान असावे, उमेदवार किमान एसएससी परीक्षा उत्तीर्ण असावा, उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र या कार्यालयात नोंदणी केलेली असावी, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदशन केंद्र अचलपूरच्या वैशाली पवार यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment