विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 







विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अमरावती, दि.24(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबवित आहे. या मोहिमेंतर्गत शासनाच्या योजनेची माहिती देणारे प्रसिद्धीरथाचे बोरगाव धर्माळे येथून उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी शुभारंभ केला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

 

अमरावती तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव धर्माळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून 'विकसित भारत संकल्प यात्रे'स प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, तहसीलदार विजय लोखंडे, सरपंच  श्रीमती जोशीला राऊत, ग्रामसेवक मनीष इंगोले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी लाभार्थ्यांना पालकमंत्री यांचे हस्ते आयुष्यमान भारत गोल्ड कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच गावाला शंभर टक्के ‘हर घर जल’ घोषित झाल्याबाबत प्रमाणपत्र देऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांचे माहिती  देणारे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला. मा.पंतप्रधान यांचा विकसित भारत बनविण्याचा संकल्प संदेश सर्व मान्यवर व नागरिकांनी ऐकला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.

 

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती