Thursday, November 23, 2023

अकोला-अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्वविक्रम स्तंभाचे अनावरण श्रम हिच प्रतिष्ठा सांगणारा उत्तुंग स्तंभ येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी












 अकोला-अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्वविक्रम स्तंभाचे अनावरण

श्रम हिच प्रतिष्ठा सांगणारा उत्तुंग स्तंभ येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. 23 (जिमाका): राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर अमरावती ते अकोला या दरम्यान 75 कि.मी. पेक्षा अधिक अंतराच्या महामार्गाचे बिटुमिनस काँक्रेटीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले. देशाच्या इतिहासात पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रात यामुळे विश्वविक्रम नोंदविला गेला आहे. श्रम हिच प्रतिष्ठा सांगणारा उत्तुंग स्तंभ येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला.

बडनेरा वाय पॉईंट येथे राजपथने उभारलेल्या गिनीज विश्वविक्रम स्तंभ स्मारकाच्या अनावरण प्रसंगी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी बोलत होते. यावेळी कांचन गडकरी यांच्यासह खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार सुलभा खोडके, आमदार वसंतदादा खंडेलवाल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महापालिका आयुक्त देविदास पवार तसेच राजपथचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संस्थापक जगदीश कदम, मोहना कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महामार्ग निर्मिती आणि गिनीज विश्वविक्रम यावर आधारित कॉफीटेबल बुकचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  

ध्येयपूर्तीसाठी अवरितपणे राबविणाऱ्या प्रत्येकासाठी हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असे सांगून                    श्री. गडकरी पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील एका मार्गीकेमध्ये 105 तास आणि 33 मिनीटात 75 कि.मी. चा बिटुमिनस रस्ता पूर्ण करीत नवा विक्रम बनविला. त्याची गिनीज विश्व विक्रमात नोंद झाली. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.  एका मार्गीकेमधील अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्त्याची एकूण 75 कि.मी. लांबी शेजारील दुपदरी पक्क्या रस्त्याच्या 37.5 कि.मी. लांबीच्या समतुल्य आहे. हे काम 3 जून 2022 रोजी सकाळी 7.27 वाजता सुरु झाले आहे. 7 जून 2022 रोजी सायंकाळी पूर्ण झाले. या रस्त्यासाठी 2 हजार 70 मे.टन. बिटुमिन असलेले 36 हजार 634 मे.टन. बिटुमिनस मिश्रण वापरण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र सल्लागारांच्या चमूसह 728 कामगारांनी रात्रंदिवस काम करुन हा प्रकल्प राजपथ इन्फ्राकॉनने पूर्ण केला. देशात रस्ते बांधणी पायाभूत सुविधा क्षेत्रात गिनीज विश्वविक्रमावर या प्रकल्पाची नोंद घेण्यात आली. या विश्वविक्रमाची आठवण म्हणून स्तंभ उभारण्यात आला. हे कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या 728 कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची नावे या स्तंभावर कोरण्यात आली आहे. श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व विषद करणारा हा स्तंभ सर्वांनी प्रेरणा देणारा ठरेल, असे ते म्हणाले.

देशात रस्ते बांधणी पायाभूत सुविधा क्षेत्रात गिनीज विश्वविक्रमाची आठवण म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्मारकावर 728 कामगारांची नावे कोरण्यात आली आहे. तसेच स्तंभावरती मौलीक कर्तव्य, संप्रभूता, बिरादरी, न्याय, समानता, धर्म निरपेक्षता, समाजवाद, गणतंत्र, प्रजातंत्र तसेच स्वतंत्रता यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हा स्तंभ येणाऱ्या पिढीला समता, बंधू आणि एकात्मतेची आठवण करुन देत राहील, असे श्री. जगदीश कदम यावेळी म्हणाले.

*****


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...