भटक्या विमुक्त जमातींना मतदार नोंदणीसह विविध योजनांचा लाभ मिळावा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


 

भटक्या विमुक्त जमातींना मतदार नोंदणीसह विविध योजनांचा लाभ मिळावा

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमरावती, दि. 9 (जिमाका): दुर्गम भागातील भटक्या विमुक्त जमातीसाठी नवीन मतदार नोंदणी, आधारकार्ड, शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेतली. प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

            विमुक्त व भटक्या जमातीचे समाज सेवक बाबुसिंग पवार, शामदास भोसले, संतोष पवार, सलीम भोसले तसेच विमुक्त भटक्या जमातीचे सदस्य यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. तसेच उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बाळासाहेब बायस, तहसीलदार विजय लोखंडे, अन्न धान्य वितरण अधिकारी उमेश खोडके यावेळी उपस्थित होते.

            विमुक्त व भटक्या जमातीच्या व्यक्तींची नवीन मतदार नोंदणी करणे, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका व विविध योजनांचा लाभ सहजरित्या मिळण्यात यावा, यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात यावीत. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांकडून वास्तव्याबाबत स्वयंघोषणापत्र, मंडळ अधिकारी यांनी केलेला पंचनामा व मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल इत्यादी कागदपत्रे घेवून नियमानुसार कार्यवाही करावी. भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधारकार्ड व नवीन मतदार नोंदणी तसेच इतर विभागाशी संबंधित सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावर तात्काळ कार्यवाही करावी. तसेच भटक्या व विमुक्त जमातीच्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती