Thursday, August 10, 2023

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक पद नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत

 

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक पद

नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत

अमरावती, दि. 10 (जिमाका): शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधनावर भरण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक‍ सेवानिवृत्त शिक्षकांनी आवेदनपत्र सादर करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थाच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांमधुन कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळेतील अत्यावश्यक ठिकाणी ही पदभरती करण्यात येणार आहे.

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक पद नियुक्तीसाठी आवश्यक अटी व शर्ती

अर्जदार व्यक्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक असणे अनिवार्य आहे. या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील. ही नियुक्ती पूर्णत: कंत्राटी स्वरुपाची राहील. कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त मानधन 20 हजार रुपये देय राहील. नियुक्तीधारकास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे विहित काम करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी, शर्ती मान्य असल्यास तसेच करार पध्दतीने नियुक्ती झाल्याने नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, अशा आशयाचे बंधपत्र, हमीपत्र प्रत्यक्ष नियुक्तीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य आहे. शाळांमधील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याचप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात कुठेही सेवा करणे आवश्यक राहील. तसेच जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातील धारणी व चिखलदरा येथे सेवा देण्यास इच्छुक शिक्षकांनी अर्जामध्ये तसा अभिप्राय नोंदविल्यास संबंधितास प्राधान्य देण्यात येईल. सेवानिवृत्त शिक्षक हे वैद्यकीयदृष्ट्या काम करण्यास सक्षम असावेत. ज्या शिक्षकांना सेवाकालावधीत शिक्षा झाली असेल त्यांनी अर्ज करु नये.

अर्जदारांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालयात आवक जावक शाखेत लेखी अर्ज दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करावेत. तदनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कोणतेही कारण न देता अर्ज नाकारण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आहे. नियुक्ती कालावधीत शासन नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. वरीलप्रमाणे करण्यात  आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा करारनान्यातील मुदत यापैकी जी बाब आधी होईल त्या कालावधीपर्यंत राहील, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...