Friday, August 11, 2023

औषधी गुणधर्माच्या रानभाज्या आरोग्यवर्धक - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 









औषधी गुणधर्माच्या रानभाज्या आरोग्यवर्धक

                         

-         जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

Ø  रानभाजी महोत्सवात महिला बचत गटांचा सहभाग

Ø  अनेक दुर्मिळ रानभाज्यांची मेजवानी

                                        Ø 300 शेतकऱ्यांचा सहभाग ; 50 हजार रुपयांच्या रानभाज्या, तृणधान्याची विक्री

 

अमरावती, दि.11 :  औषधी गुणधर्म असलेल्या अनेक रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. गुळवेल, मटारु, काटेमोड, आघाडा, केना, अंबाडी आदी ग्रामीण भागात उगवणाऱ्या रानभाज्या शहरी नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्यवर्धक या रानभाज्यांना महोत्सवाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या परिसरात कृषी विभाग, आत्मा’ तसेच श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, प्रादेशिक संशोधन केंद्र व स्त्री शक्ती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून श्री. कटियार बोलत होते.

 

विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, रामेती अमरावतीचे प्राचार्य विजय चवाळे, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख, प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रमुख वर्षा टापरे, स्त्री शक्ती मंचच्या अध्यक्षा प्रा. वृक्षाली ओक आदी यावेळी उपस्थित होते.

 

श्री. कटियार म्हणाले की, रानभाज्या व तृणधान्य आरोग्यासाठी गुणकारी असून त्याचा आहारात नियमितपणे समावेश असावा. रानभाजी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील बचत गट तसेच शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले असून या स्टॉलवर रानभाज्या मध्ये गुळवेल, मटारू, भुई आवळा, राई भाजी, कपाळ- फोळी, रताळे, काटेमोड, आघाडा, केना, तरोडा, अंबाडी, दिंडी या भाज्यांचा समावेश असून या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची खरेदी करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विपणन साखळी निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

गुळवेल या भाजीमध्ये अँटी ऑक्स्डिेंटस् ॲटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म असून रक्तपेशी वाढविण्यास मदत करते. तसेच मधुमेह, त्वचेची समस्या या रोगांवर अतिशय उपयुक्त आहेत. राई ही भाजी कफ-पित्तदोष रक्त विकार, खाज, कुष्ठरोग, पोटांचे विकार यासाठी उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महोत्सवात लावलेल्या विविध रानभाज्यांच्या व खाद्यपर्दाथांच्या स्टॉल्सला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

 

 

                                कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

 

 

महोत्सवात कृषी विज्ञान केंद्र घातखेडच्या गृहविज्ञान विषयतज्ज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी ‘लोप पावलेल्या भरडधान्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. पीकेव्हीच्या प्राध्यापिका डॉ. पाटील यांनी ‘आहारातील तृणधान्यांचे महत्व’ याविषयी तसेच विदर्भातील रानभाज्या व त्यांचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मोर्शी तालुक्यातील निंबी येथील प्रगतीशिल शेतकरी सौ. लता पोहेकर यांनीही आहारातील रानभाज्याचे महत्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

 

महोत्सवात सहभागी झालेले उदखेडचे दिनकर कानतोडे, धारणीच्या श्रीमती भगिरथी कास्देकर या प्रगतीशिल शेतकऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

महोत्सवात अंबाडी, केणा, कुंजर, आघाडा, करटुले, डोडा भाजी, मोहफुले, तरोटा, करडखोसला, फांदीची भाजी, राजगिरा, गुळवेल, कुडा, अरबी, करवंद, शेवगा, बांबूचे कोंब, माठ, काटेमाठ, तांदूळजा, शिलगुडी, मशरुम, अळूची पाने, भोसा, पिंपळ, कवठ, चिंच, बेलफळ, चमकुरा, शतावरी, सुरण, स्टार फ्रुट, पॅपॅनस इत्यादी रानभाज्या तसेच अळूच्या वडया, चवळीची भाजी, मिश्र भाजीचे वडे, बांबूच्या कोंबाची भाजी, अंबाडीची भाकर यासोबत विविध कडधान्यांचे विक्री व खाद्यपर्दाथांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सुमारे तीनशे या महोत्सवात सहभागी झाले होते. तसेच या माध्यमातून सुमारे 50 हजार रुपयांच्या रानभाज्या व तृणधान्याची विक्री झाली.

 

जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स’ महोत्सवाच्या आयोजन मागचा उद्देशबाबत आत्माच्या प्रकल्प संचालिका श्रीमती निस्ताने यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.  

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...