महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात शैक्षणिक संस्था

व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 4 (जिमाका) : राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

हा उपक्रम तीन टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करु शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्प्यात करण्यात येईल.

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेले उत्तम दोन संकल्पनांमधून सर्वोकृष्ट शंभर संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या शंभर नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रयेक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोकृष्ट दहा विजेते निवडले जातील. सर्वोकृष्ट दहा विजेत्यांमध्ये 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचे बीज भांडवल देण्यात येणार आहे.

उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दहा अशा एकूण 360 नवउद्योजकांना बारा महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या 360 नवसंकल्पनेचे  राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून सर्वोकृष्ट दहा नवउद्योजकांना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नाविण्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष पारितोषिकेही दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद, बस स्टेशन रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजका मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती