Thursday, August 31, 2023

अखर्चित निधीचा अहवाल तत्काळ सादर करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजन समितीचा आढावा;

अखर्चित निधीचा अहवाल तत्काळ सादर करा

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2021 व 2022 या आर्थिक वर्षातील अखर्चित निधी व शिल्लक असलेला निधीचा अहवाल तत्काळ जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करावा. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षातील नियोजनानुसार नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेत खर्च व नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी नियोजन भवनातील बैठकीत घेतला, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के यांच्यासह विविध विभाग प्रमुख, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सन 2021 व 2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात आलेली मंजूर कामे, प्राप्त निधी, झालेला खर्च कामांची सद्यस्थिती, उपयोगिता प्रमाणपत्र व निधी शिल्लक असल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण, सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कामांचे नियोजन, स्पिल निधी मागणी व नियोजित कामांचा अंदाजपत्रकीय रकमेसह संपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले. तसेच  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्यांचे संबंधित यंत्रणेचे अनुपालन अहवाल, जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचा आढावा या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

 

जिल्हा विकास आराखड्याबाबत सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मस्के यांनी केले. प्रस्तावित आराखडयाबाबत सुधारणा किंवा बदल असल्यास त्वरित जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सुधारणा करुन घेण्यात याव्यात, असे निर्देश श्री. कटियार यांनी दिले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...