जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजनाचा आढावा कामे पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करा

 






जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजनाचा आढावा कामे पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करा

अमरावती, दि. 11 (जिमाका): जिल्हा नियोजनानुसार नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी तत्काळ प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजनेत खर्च व नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी नियोजन भवनातील बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के यांच्यासह विविध विभाग प्रमुख, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, धारणी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन तसेच सर्व जिल्हास्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा उपस्थित होते.

सन 2022-23 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात आलेली मंजूर कामे, प्राप्त निधी, झालेला खर्च कामांची सद्यस्थिती, उपयोगिता प्रमाणपत्र व निधी शिल्लक असल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण, सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कामांचे नियोजन, स्पिल निधी मागणी व नियोजित कामांचा अंदाजपत्रकीय रकमेसह संपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले. तसेच  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्यांचे संबंधित यंत्रणेचे अनुपालन अहवाल, जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचा आढावा या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

श्री. कटियार यांनी सन 2022-23 मधील झालेला खर्च, कामांची सद्यस्थिती, उपयोगिता प्रमाणपत्र या बाबतची माहिती तत्काळ जिल्हा नियोजन समिती कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीत नियतव्यय 395 कोटीच्या अनुषंगाने योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव सर्व संबंधित यंत्रणांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

जिल्हा विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्याबाबत श्री. कटियार यांनी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनाही यामध्ये सुधारणा किंवा बदल असल्यास दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सुधारणा करुन घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती