जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान 18 ऑगस्टला राबविणार - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





जिल्ह्यात दिव्यांगांच्या दारी अभियान 18 ऑगस्टला राबविणार

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

        अमरावती, दि. 4 (जिमाका) : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. अमरावती जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट रोजी राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिली. या कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू उपस्थित राहतील.

बचत भवन येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबविण्याबाबत व या संदर्भातील नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर तसेच संबंधित विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करून एक नवीन विभाग तयार केला आहे. दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियोजित शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्याकडील शासकीय योजनांचे स्टॉल्स शिबिरामध्ये लावावे. लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावे. तसेच त्यांच्या गरजेनुसार त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. यासाठी प्रत्येक विभागाने दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रचार, प्रसिध्दी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांगाच्या विविध योजनांबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वितरण करणे, संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी (UDID) कार्ड वितरण, दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, शिधा पत्रिका मधील इतर फेरफार व नवीन नाव समाविष्ट करणे, दिव्यांगांना रोजगाराच्या संधी, बँकेतील कर्ज प्रकरणे, रोजगार नोंदणी, उपलब्ध नोकरी आणि त्याचे स्वरूप याचा लाभ दिव्यांग बंधू-भगिनींना देण्यात यावा.

 यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढाकार घ्यावा. शिबिराच्या दिवशी कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी शिबिरात प्राप्त झालेल्या अर्जानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक कृत्रिम अवयव व साहित्य देण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांचे मोजमाप घ्यावे व त्याबाबतचे लाभार्थीनिहाय अभिलेखे तयार करावे. ग्रामीण आणि शहरी दिव्यांग पात्र लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती