‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानात

सर्वांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 10 (जिमाका): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व स्थानिक नागरी स्वराज्य संस्थांनी योगदान देणे व मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत शिलाफलक, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन, ध्वजारोहण कार्यक्रम असे उपक्रम राबविणे सुरु आहे. शिलाफलक उपक्रमांतर्गत शहरातील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, शाळा, महाविद्यालय अशा संस्मरणीय एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करावी. या शिलाफलकामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, दिनांक, मा. पंतप्रधान महोदयांचा संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे, मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि तिचा गौरव यांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शुरवीरांना विनम्र अभिवादन असे वाक्य इत्‍यादी बाबी नमूद कराव्यात.

शिलाफलकावर लिहिण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे ज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक, संरक्षण दल, निम लष्करी दल, राज्य व केंद्रीय पोलीस दलातील शहिदांचा समावेश करण्यात येत आहे.

वसुधा वंदन उपक्रमांतर्गत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्यावर शहरातील योग्य जागा निश्चित करुन वसुधा वंदन म्हणून लागवडीसाठी देशी प्रजातींची रोपे वन विभागाकडून प्राप्त करुन विविध देशी प्रजातीच्या 75 रोपट्यांची लागवड करुन ‘अमृतवाटिका’ तयार करण्यात येत आहे.

 स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरी स्वराज्य कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केले, अशा संरक्षण दल, निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी, माजी सैनिकांचा तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमावेळी शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्थानिक पारंपरिक पध्दतीने यथोचित सन्मान करावा.

ध्वजारोहण कार्यक्रम या उपक्रमांतर्गत स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील अमृत सरोवर, शाळा, कार्यालय यापैकी योग्य अशा ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, सर्व नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करणे व दि. 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत मागील वर्षीप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकाविणेबाबत प्रशासनामार्फत कळविण्यात करण्यात आले आहे.

दि. 16 ते 20 ऑगस्ट 2023 या दरम्यान महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील प्रभागनिहाय एक, दोन मूठ माती घेऊन त्यातून शहराचा कलश तयार करुन तो सन्मानपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येईल. जिल्हास्तरावर जमा झालेल्या सर्व कलशांमधून थोडी माती घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा एक कलश तयार करुन तो सन्मानपूर्वक जिल्हास्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येईल. अशा रितीने प्रत्येक जिल्ह्याचा तयार झालेला कलश दि. 27 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान म. पंतप्रधान महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाण्यास जिल्हास्तरावरुन एका युवकाची निवड करण्यात येईल. यासाठी नेहरु युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घेण्यात येणार आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती