अमरावती जिल्हा ‘एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार







 शासन आपल्या दारी; ‘एक्सोर्ट आऊटरिच’ कार्यक्रमात

निर्यातीबाबत मार्गदर्शन

अमरावती जिल्हा ‘एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे

-   जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यात संत्री, कापूस, सोयाबिन उत्पादनांसह विविध कृषी व इतर वस्तूंचे उत्पादन पाहता निर्यात विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्यानुसार अमरावती जिल्हा हे ‘एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी विविध विभाग, उद्योजक, कृषी उत्पादक कंपन्या, व्यापारी बांधवांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले. 

जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहकार्याने जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आऊटरिच’ कार्यशाळा नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. अपर महानिदेशक विदेश व्यापार कार्यालयाच्या सहायक विदेश व्यापार स्नेहल ढोके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, अमरावती एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातूरकर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिपाली लाकडे, अपेडाच्या प्रणिता चौरे, इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिजनेसचे राजन ठवकर, इंडस्ट्री असोशिएशनचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक जिल्हा निर्यात केंद्र करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातून कृषी व इतरही उत्पादनांची निर्यात वाढावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांकडून अनेकविध सुविधा देण्यात येत आहेत. त्यांचा लाभ घेऊन जिल्ह्यातून अधिकाधिक उत्पादने निर्यात होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

जिल्ह्यात विविध उद्योगांना चालना मिळून उद्योगातील उत्पादित होणाऱ्या मालाची उद्योजक, निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात करावी.यासाठी केंद्र सरकारचे विदेश व्यापार महासंचालनालय सहकार्य व मार्गदर्शन करण्यास तयार आहे. याचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असेही  श्री. कटियार यावेळी म्हणाले.

विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक महासंचालक श्रीमती ढोके यांनी अमरावती जिल्ह्यातून निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबतची विस्तृत माहिती सादरीकरणातून दिली. जिल्हा निर्यात केंद्राचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजकांना निर्यात यासाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू असल्याचे सांगून, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या नागपूर व्हीसीलिंकबद्दलही माहिती दिली. त्यामुळे निर्यातदार आणि नवीन येणाऱ्यांचे प्रश्न थेट सोडविता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही जिल्ह्यात अशाप्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येतील, असे त्या म्हणाल्या.

‘अपेडा’मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, ‘इंडियन ट्रेड पोर्टल’, ‘इंडियन बिझनेस पोर्टल’ची माहिती तज्ज्ञांनी दिली. यावेळी मार्गदर्शकांनी आयईसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात कशी करावी, बायर-सेलर मीट, इपीसीची भूमिका, वित्तीय साह्य मिळविण्याचे पर्याय ई-कॉमर्स आदींबाबत मार्गदर्शन केले.  अनेक उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, उद्यमशील युवक-युवती, कार्यरत निर्यातदार आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कार्यशाळेला उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 120 प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय, विदेश व्यापार कार्यालय, नागपूर तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन विदेश व्यापार कार्यालयाच्या सोनाली मोरे यांनी तर आभार प्रतीक गजभिये यांनी मानले.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती